ट्रॅक्टरखाली दबून चालकाचा मृत्यू चाचेर शिवारातील दुर्दैवी घटना : नदीकाठावर अडकलेली दाताळ काढताना ट्रॅक्टर उलटला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / रामटेक : शेतातील चिखलणीचे काम आटोपून घरी परतत असताना ट्रॅक्टरला जोडलेली लोखंडी दाताळ नदीकाठावर अडकल्याने ती काढण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर जागेवरच फिरून उलटला. या दुर्घटनेत ट्रॅक्टरखाली दबून चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी १६ सायंकाळी रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चाचेर (ता. मौदा) शिवारात घडली.
विनोद लक्ष्मण सतीकोरसे (४०, रा. नागठाणा-चाचेर, ता. मौदा) असे मृत चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सपना अभय बावनकुळे यांची चाचेर शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतात विनोद सतीकोरसे ट्रॅक्टरने चिखलणी करण्यासाठी गेले होते. काम आटोपल्यानंतर सायंकाळी ते ट्रॅक्टर घेऊन घराकडे निघाले.
दरम्यान, मार्गातील नदीच्या काठावर ट्रॅक्टरला मागे जोडलेली लोखंडी दाताळ अडकली. दाताळ बाहेर काढण्यासाठी विनोद यांनी ट्रॅक्टरचा वेग वाढविला.
मात्र, दाताळ निघण्याऐवजी ट्रॅक्टर जागेवरच गोल फिरला आणि नदीच्या पात्रात उलटला. या दुर्घटनेत विनोद सतीकोरसे ट्रॅक्टरखाली दबले गेले. त्यांना गंभीर दुखापत झाली तसेच पाण्यात बुडाल्याने काही वेळातच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे नागठाणा-चाचेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




Petrol Price




