जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त भंडारा येथे विविध उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने व सुसह्य जीवन जगता यावे, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहावे तसेच त्यांच्या हक्कांबाबत जनजागृती व्हावी, यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने १ ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याअनुषंगाने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिव्हील लाईन, भंडारा येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा ज्येष्ठ नागरिक मंडळ (फेसकॉम)चे अध्यक्ष तथा जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य जाधवराव साठवणे होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नागरिक मंडळ, लाखनीचे अध्यक्ष मार्कंड पडोळे, नागरिक मंडळाचे अध्यक्ष माधवराव फसाटे, भंडारा जिल्हा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सचिव हिरामणजी लांजेवार, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आशा कवाडे, विशेष अधिकारी (शानिशा) विठ्ठलसिंग बलावणे, कार्यालय अधीक्षक लिना सरोदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शपथ घेतली. मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा भेटवस्तू व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर -
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा सुमारे १५० ते २०० ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. विशेष अधिकारी (शानिशा) विठ्ठलसिंग बलावणे यांनी प्रास्ताविकातून ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेली कर्तव्ये व जबाबदाऱ्या तसेच त्यांच्या जीवनातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे कायदे व योजना, त्यांचे हक्क, उपलब्ध सोयी-सुविधा तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या हेल्पलाईनबाबतही माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना अल्पोपहार व चहाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृक्षवल्ली तागडे व अंशिका सायरे यांनी केले, तर आभार नूतन ईटनकर यांनी मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, समाज कल्याण कार्यालय, इतर मागासवर्ग कार्यालय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, विविध महामंडळांचे कर्मचारी, क्रिस्टलचे कर्मचारी तसेच गणमान्य नागरिक उपस्थित होते.




Petrol Price




