नोकरीच्या आमिषाने बेरोजगाराची केली ६ लाखाने फसवणूक : दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / जालना :
एसआरपीएफमध्ये नोकरीस लावून देतो म्हणून दोन पोलिस कर्मचाऱ्यांनीच  एका बेरोजगार तरुणाकडून ६ लाख रुपये घेउं  काही दिवस त्याला झुलवत ठेवले. यानंतर त्या तरुणाने नोकरीबाबत तगादा लावला असता पोलिसांनी त्यास खाकी गणवेश, टोपी दिली. त्याबरोबरच रुजू होण्यासाठी ऑर्डरही दिली. यानंतर तक्रारदार गुरुबच्चन चौकातून एसआरपीएफच्या कार्यालयात रुजू होण्यासाठी गेला. मात्र तेथील अधिकाऱ्यांनी हा आदेश बनावट असल्याचे सांगितले . त्यामुळे तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे कळाले. या प्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून फिरोज नासीर पठाण (पोलिस मुख्यालय, जालना), फेरोज इकबाल खान (मांजरगाव ता. बदनापूर) या दोन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, तुमचा मुलगा जावेद याला एसआरपीएफ ग्रुप ३ मध्ये नोकरी लावून देतो, असे म्हणत अ. फिरोज नासीर पठाण (पोलिस मुख्यालय, जालना), बदनापूर येथील फेरोज इकबाल खान या दोन पोलिस शिपायांनी लालखान कादर खान पठाण (मांजरगाव ता. बदनापूर) यांना आमिष दाखवले. लालखान कादर खान पठाण यांच्याकडून दोघांनी २ जानेवारी २०१५ ते ६ सप्टेंबर २०१८ या दरम्यान ६ लाख रुपये घेतले. मात्र सहा लाख रुपये देऊनही नोकरी मिळाली नसल्याने आणि पुढे काहीच कारवाई होत नसल्यामुळे लालखान पठाण यांनी दोन्ही पोलिसांकडे नोकरी देण्यासाठी तगादा लावला. यानंतर या दोन पोलिसांनी जावेदला नोकरी लागली आहे, अशी लालखान यांना थाप मारत जावेद याला बनावट नियुक्तीपत्र, पोलिस गणवेशासह टोपीही दिली. जावेद हा तरुण नोकरीवर हजर होण्यासाठी गेला असता तेथील अधिकाऱ्यांनी हा आदेश बनावट असल्याचे सांगितले. यानंतर त्या तरुणाला आपली फसवणूक झाली असल्याचे समजले. हा प्रकार त्याने वडिलांना सांगितला असता दोघांनीही तालुका जालना पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
या प्रकरणात आरोपी असलेले पोलिस फेरोज नासीर पठाण आणि फेरोज एकबाल खान हे दोघेही जालना न्यायालयात कोर्ट पैरवी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. या आरोपींनी अनेकांना गंडा घातला असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मात्र, आरोपी फरार आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू अाहेत.
   Print


News - Rajy | Posted : 2018-09-08


Related Photos