अहेरी विधानसभा क्षेत्रात २ लाख ३६ हजार २८६ मतदार करणार मतदान


- २९० मतदान केंद्र, निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज
- निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लोणारकर यांची माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
विशेष प्रतिनिधी / अहेरी
: विधानसभा निवडणूकीसाठी येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २४ ऑक्टोबर  रोजी मतमोजणी होणार आहे. प्रशासनाकडून निवडणूकीची तयारी पूर्ण झाली असून अहेरी विधानसभा क्षेत्रात २९० मतदान केंद्रांवरून २ लाख ३६ हजार २८६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांनी दिली आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रात १ लाख ६७ हजार ९ महिला तर १ लाख १९ हजार ४९७  पुरूष मतदार आहेत. २ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. निवडणूकीत नामांकन दाखल करणाऱ्या उमेदवारांनी तसेच नागरीकांनी आदर्श आचारसंहीतेचे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.
येत्या २७ सप्टेंबर रोजी निवडणूकीची अधिसुचना जाहीर होईल. २७ सप्टेंबर ते ४  ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. यादरम्यान २८, २९ सप्टेंबर आणि २ ऑक्टोबर  ला शासकीय सुट्टी असल्याने नामनिर्देशन भरता येणार नाहीत. ५ ऑक्टोबर  रोजी नामनिर्देशनपत्रांची छाणणी होईल. तर ७ ऑक्टोबर  रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 
उमेदवारांना चिन्हे मिळाल्यानंतर १९ ऑक्टोबर  पर्यंत प्रचार करता येणार आहे. निवडणूकीच्या ४८ तास आधी प्रचार बंद करावा लागणार आहे. निवडणूकीत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होउ नये याकरीता राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आली.  
मतदान केंद्रांवर निवडणूकीच्या एक तासाआधी माॅक पोल घेण्यात येणार आहे. यामुळे उमेदवारांच्या प्रतिनिधींनी सकाळी ६ वाजता सबंधित मतदान केंद्रावर उपस्थित रहावे. जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेता सकाळी ७  ते दुपारी ३ वाजतापर्यंत मतदानाची वेळ ठेवण्याची विनंती निवडणूक विभागाकडे केली आहे. यावर निवडणूक विभागाकडून प्राप्त सूचनांनुसार निर्णय घेतल्या जाईल, अशी माहिती  उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांनी दिली. 
आचारसंहीता लागू झाल्यापासून विविध पथके कार्यरत झाली आहेत. प्रत्येक कार्यवाहीचे व्हीडीओ चित्रीकरण केले जात आहे. ज्या ठिकाणी आचारसंहीतेचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळेल तिथे सबंधित पथक पोहचून कार्यवाही करेल. त्याचा अहवाल निवडणूक विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. भरारी पथके, नाकाबंदी, वाहनांची तपासणी करण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-24


Related Photos