पोलीस स्टेशन नेलगुंडा व ग्रामस्थांच्या श्रमदानातून दुर्गम भागातील नाल्यावर पूल उभारणी : नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः पावसाळ्याच्या काळात नाले व ओढ्यांना पाणी आल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होतात. यामुळे मा. एम. रमेश सा. पोलीस अधिक्षक गडचिरोली, मा. सत्यसाई कार्तिक सा.अभियान, गडचिरोली मा. गोकुळ सा. प्रशासन, गडचिरोली, मा. हर्षवर्धन सा. अतिरिक्त पोलीस अधिक्षक, प्रणहिता, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा. भामरागड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नेलगुंडा येथील प्रभारी अधिकारी अजिंक्य इथापे सर तसेच त्यांचे सहाय्यक परी. पोउपनी राहुल जेंगठे सर व पोस्टे नेलगुंडा येथील सर्व अंमलदार आणि एसआरपीएफ जालना गट क्र. ०३ चे अधिकारी पोउपनी मोराणकर सर व SRPF चे सर्व अंमलदार तसेच नेलगुंडा येथील गाव पाटील महेश वरसे व ग्रामस्थ यांनी एकत्र येत श्रमदानाच्या माध्यमातून बोगामी नाल्यावर पूल उभारण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतले.
सदर नाल्यातून मार्गक्रमण करताना स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः शेतकरी, विद्यार्थी, महिला व इतर नागरिकांना ये-जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन पोलीस स्टेशन नेलगुंडा व ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेत श्रमदानातून पूल उभारणीचे काम पूर्ण केले.
या उपक्रमातून पोलीस दलाने केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित न राहता, दुर्गम भागातील नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस व ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभागातून उभारण्यात आलेला हा पूल म्हणजे लोकसहभाग, सामाजिक बांधिलकी आणि परस्पर सहकार्याचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
पोलीस आणि जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे, तसेच दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या श्रमदान उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना दळणवळणासाठी अधिक सोयीस्कर मार्ग उपलब्ध होण्यास मदत होणार असून, पोलीस दल आणि ग्रामस्थ यांच्यातील समन्वय व विश्वास अधिक दृढ होण्यास हातभार लागणार आहे. पोलीस स्टेशन नेलगुंडा व नेलगुंडा ग्रामस्थ यांच्या संयुक्त श्रमदानातून साकारलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, लोकसहभाग आणि ग्रामविकासाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरत आहे.




Petrol Price




