उच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हा : शरद शेलार


- महाराष्ट्र दर्शन सहलीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
नक्षल्यांच्या भुलथापांना बळी न पडता उच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी होण्याचा मानस बाळगा, असे आवाहन नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांनी केले.
शासनामार्फत राबविण्यात येणा-या गडचिरोलीतील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र दर्शन सहल नागपूरात आली असता नक्षल विरोधी अभियान, महाराष्ट्र राज्य, नागपूर तर्फे सुराबर्डी येथील अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या प्रसंगी मंचावर अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी प्राचार्य शरद कदम, प्रभारी पोलीस उपअधीक्षक श्री. अडकी, सहायक पोलीस निरीक्षक संजय पिसे उपस्थित होते.
नक्षली हे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी खोट्या भुलथापा देऊन लहान वयात विद्यार्थ्यांना नक्षल चळवळीत सहभागी करीत असल्याचे सांगत श्री. शेलार म्हणाले की, ज्येष्ठ नक्षली नेते आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून स्वतःच्या मुलांना चांगले शिक्षण देत आहेत, त्यांचा हा दुटप्पीपणा उघड झाला आहे. आदिवासी बांधवांची दिशाभुल होत असून नक्षल्यांकडून गडचिरोलीतील शिक्षण, आरोग्य व इतर पायाभुत सुविधांना
विरोध करून गडचिरोलीच्या विकासात सातत्याने अडथळा निर्माण केला जात आहे. विद्यार्थ्यांनी नक्षल्यांच्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता आपले लक्ष केवळ शिक्षणाकडे केंद्रीत करावे. शिक्षणामुळे चांगली व वाईट विचारसरणी काय आहे, हे आपल्याला कळेल. त्यामुळे शिक्षणाद्वारे स्वतःचा व गडचिरोलीचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. चांगले उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, अभियंता, शिक्षक, प्रशासन व पोलीस अधिकारी व्हावे, असे आवाहन शेलार यांनी यावेळी केले.
सध्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रस्ते विकास व दुरसंचारच्या कामांना गती देण्यात आली असून येथील नागरीकांना दळणवळण व भ्रमणध्वनीच्या माध्यमातून एकमेकांशी त्वरीत संपर्क साधायला सोपे जाणार आहे, असे शेलार यांनी यावेळी सांगितले.
ही २१ वी सहल असून यात गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम व अतिदुर्गम भागातील एकूण ८२ विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. या सहलीतील विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद, शेगाव, नागपूर आदी शहरांना भेटी देऊन तेथील शहरांचा झालेल्या औद्योगिक, शैक्षणिक विकास आदींची माहिती जाणून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी नागपूरातील रमन विज्ञान केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, दीक्षाभूमी आदी
विविध ठिकाणांना भेटी देऊन विविध माहिती जाणून घेतली.
यावेळी विद्यार्थ्यांनी सहलीतील अनुभव कथन केले. आजपर्यंत साधे गडचिरोली शहरापर्यंत आपण गेले नसून महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारामुळे मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांना भेटी देण्याची संधी मिळाली. या शहरांमध्ये झालेली प्रगती जवळून पाहता आली. या शहरांसारख्या सुविधा गडचिरोली जिल्ह्यातही याव्यात, असे मनोगत विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विशेष माहिती व जनसंपर्क कक्षाचे प्रभारी सहायक संचालक हंसराज राऊत यांनी केले. कार्यक्रमात गडचिरोलीचे पोलिस उपनिरीक्षक हिम्मतराव सर्गर यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी व सहलीतील विद्यार्थी उपस्थित होते.  Print


News - Nagpur | Posted : 2018-10-10


Related Photos