महत्वाच्या बातम्या

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोलीची आरोग्यसेवा अधिक सक्षम करणार


- आरोग्य संस्थांनी समन्वयातून रुग्णांना दर्जेदार सेवा द्यावी - आमदार डॉ. मिलिंद नरोटे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून, उपलब्ध आरोग्य संस्थांनी परस्पर समन्वयातून नागरिकांना दर्जेदार, तत्पर आणि संवेदनशील आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी दिले.

आमदार डॉ. नरोटे यांच्या विनंतीवरून जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. फैजल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे, महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दुर्गम भागात आरोग्य सुविधांचा विस्तार -
गडचिरोलीसारख्या भौगोलिकदृष्ट्या दुर्गम जिल्ह्यात नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध पावले उचलण्यात येत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

अहेरीसारख्या दुर्गम भागात स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय मंजूर करून ते कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याचबरोबर गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयाची क्षमता वाढविण्याचे काम सुरू असून, सध्या १०० खाटांची अधिकृत क्षमता असलेल्या या रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे काम पूर्ण करून ती लवकरच कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाल्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर, अतिरिक्त वैद्यकीय मनुष्यबळ आणि आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग अधिक व्यापक झाला आहे. या सुविधांचा प्रत्यक्ष लाभ ग्रामीण आणि दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व संबंधित आरोग्य संस्थांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.

प्रत्येक रुग्णाला वेळेत आणि योग्य उपचार मिळणे ही सामूहिक जबाबदारी -
आमदार डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले, मी स्वतः जवळपास दहा वर्षे वैद्यकीय क्षेत्रात काम केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात खासगी आरोग्य सुविधांची उपलब्धता तुलनेने मर्यादित असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा मोठा आधार शासकीय आरोग्य यंत्रणेवर आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला वेळेत, योग्य आणि दर्जेदार उपचार मिळणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयाची अधिकृत क्षमता १०० खाटांची असली तरी अनेकदा येथे २०० ते ३०० रुग्णांना सेवा द्यावी लागते. परिणामी डॉक्टर, परिचारिका आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठा कामाचा ताण निर्माण होतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून उपलब्ध झालेले अतिरिक्त वैद्यकीय मनुष्यबळ आवश्यकतेनुसार वापरावे आणि महिला व बाल रुग्णालयासह जिल्हा सामान्य रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले.

तीन प्रमुख आरोग्य संस्थांमध्ये स्पष्ट समन्वयाची गरज -
रुग्णांच्या उपचारांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महिला व बाल रुग्णालय यांच्यात स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत प्रशासकीय किंवा तांत्रिक कारणांमुळे अडथळे निर्माण होऊ नयेत, याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचार, रेफरल आणि पुढील वैद्यकीय प्रक्रियेबाबत योग्य समुपदेशन मिळावे, यावरही बैठकीत भर देण्यात आला.

बैठकीत आरोग्य सुविधांबाबत महत्त्वाचे निर्देश -
बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय व निर्देश देण्यात आले.
- सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज Advanced Life Support (ALS) रुग्णवाहिका खरेदीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
- गंभीर रुग्णांच्या वाहतुकीसाठी लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध राहील, अशी व्यवस्था करावी.
- जिल्ह्यातील आवश्यक ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून काही रुग्णवाहिका आपत्कालीन सेवेसाठी राखीव ठेवाव्यात.
- महिला व बाल रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून त्यातील काही भाग एका महिन्याच्या आत कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करावा.
- विस्तारित महिला व बाल रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मिती व पदभरतीचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने सादर करून त्याचा नियमित पाठपुरावा करावा.
- जिल्ह्यासाठी प्रस्तावित MRI मशीनच्या खरेदीची प्रक्रिया गतिमान करावी.
- जिल्हा वार्षिक योजना तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून त्याचा नियोजनबद्ध वापर करावा.
- रुग्णालयांमधील औषधे, वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ आणि अन्य आवश्यक सुविधांचा नियमित आढावा घ्यावा.
- सर्व आरोग्य संस्थांमध्ये परस्पर संवाद आणि समन्वयासाठी प्रभावी यंत्रणा निर्माण करावी.

निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही - जिल्हाधिकारी -
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे सांगितले.

जिल्हा वार्षिक योजना आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. मात्र, उपलब्ध निधीचा योग्य, पारदर्शक आणि परिणामकारक विनियोग करून त्याचा थेट लाभ रुग्णांना मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य क्षेत्रातील उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर, आवश्यक उपकरणांची उपलब्धता, मनुष्यबळाचे योग्य नियोजन आणि रुग्णसेवेत समन्वय या बाबींवर प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

आधुनिक सुविधांचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न -
गडचिरोली जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महिला व बाल रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच दुर्गम भागातील आरोग्य संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध होत असलेल्या सुविधांचा प्रभावी वापर करणे हे प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान आहे.

उपलब्ध तज्ज्ञ मनुष्यबळ आणि आधुनिक वैद्यकीय सुविधांचा योग्य समन्वय साधल्यास गंभीर रुग्णांना जिल्ह्याबाहेर रेफर करण्याची गरज कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी प्राथमिक पातळीपासून जिल्हास्तरीय रुग्णालयांपर्यंत प्रभावी रेफरल आणि उपचार व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे.

समन्वयातून गडचिरोलीची आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करू -
मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यात उपलब्ध झालेल्या आधुनिक आरोग्य सुविधा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि वाढीव वैद्यकीय मनुष्यबळाचा प्रभावी वापर करून जिल्ह्याची आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्यात येईल, असे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी स्पष्ट केले.

प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि वेळेवर आरोग्यसेवा मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.





  Print






Related Photos