पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांकडून बल्लारपूर पाणीपुरवठा योजनेची पाहणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : यंदा कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, बल्लारपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वर्धा नदीतील पाणीसाठाही मर्यादित आहे. उपलब्ध पाणीसाठा आगामी उन्हाळ्यापर्यंत टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी गुरुवार दि २६ नोव्हेंबर रोजी वर्धा नदीवरील सुधारित बल्लारपूर पाणीपुरवठा योजना टप्पा-२ ची पाहणी केली. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
पाहणीदरम्यान पालकमंत्री डॉ. उईके यांनी बल्लारपूर शहरातील संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेत प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बंद पडलेल्या बोअरवेल व विहिरींची दुरुस्ती करावी, पिण्याच्या पाण्याच्या विहिरींचे सिमेंटीकरण करावे, तसेच नागरिक वापरत नसलेल्या विहिरींचा पाणीपातळी वाढविण्यासाठी उपयोग करता येईल का, याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी नगर परिषद प्रशासनाला दिल्या.
आगामी काळात पाण्याची टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा. यासाठी नगर परिषद प्रशासनाने जनजागृती मोहीम राबवावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. सन २०११ च्या जनगणनेनुसार बल्लारपूर शहराची लोकसंख्या ८९ हजार ४७२ होती. सन २०५० पर्यंत शहराची अंदाजित लोकसंख्या १ लाख ४३ हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सन २०२० मध्ये शहराची दररोजची पाण्याची गरज १९.१५ दशलक्ष लिटर होती. हीच गरज सन २०५० पर्यंत २६.६९ दशलक्ष लिटर प्रतिदिन होण्याचा अंदाज आहे. सध्या शहरात एकूण ११ हजार १० नळजोडण्या असून, नियमितपणे १७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत १० टक्के कपात करून दररोज १५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा सुरू आहे.
वर्धा नदीपात्रातील उपलब्ध पाणीसाठा फेब्रुवारी २०२७ अखेरपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. त्यानंतर उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन मार्च ते ऑगस्ट २०२७ या कालावधीसाठी निम्न वर्धा प्रकल्पातून २.६५ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सुधारित बल्लारपूर पाणीपुरवठा योजना टप्पा-२ राबविण्यात येत आहे. या योजनेतील रेडियल वेल पंप हाऊस, ॲप्रोच ब्रिज, अस्तित्वातील हेडवर्क्सची सुधारणा, अशुद्ध पाण्याची उर्ध्वनलिका, जलशुद्धीकरण केंद्राची सुधारणा, शुद्ध पाण्याची उर्ध्वनलिका, विद्यानगर येथील मुख्य संतुलन टाकी, शुद्ध पाण्याची गुरुत्वनलिका, जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील उंच पाण्याची टाकी, दीनदयाळ वॉर्ड, कन्नमवार वॉर्डातील उंच पाण्याच्या टाक्या, वितरण व्यवस्था आणि जुन्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती यांसह अन्य किरकोळ कामे पूर्ण झाली आहेत. अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता संजय अष्टगी यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा, तहसीलदार रेणुका कोकाटे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता संजय अष्टगी, मुकेश धकाते, हरीश शर्मा आदी उपस्थित होते.




Petrol Price




