रगुती वीज दुरुस्ती करताना विजेचा धक्का : ४० वर्षीय तरुणाचा मृत्यू


- निलज-मोरगाव येथील घटना; मुकेश कोल्हे यांच्या आकस्मिक निधनाने गावात हळहळ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : घरगुती वीज दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक विजेचा जोरदार धक्का लागल्याने ४० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील निलज-मोरगाव येथे घडली. मुकेश मनसाराम कोल्हे ४० वर्षे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलज येथील रहिवासी असलेले मुकेश कोल्हे हे वीज दुरुस्तीच्या कामात पारंगत होते. गावात तसेच परिसरात ते विविध ठिकाणी विद्युत दुरुस्तीची कामे करीत असत. मंगळवारी सकाळी ते शेजाऱ्यांच्या घरी घरगुती वीज दुरुस्तीचे काम करीत होते. याचदरम्यान अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्क्यामुळे ते खाली कोसळले.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
मुकेश कोल्हे हे सामाजिक कार्यातही अग्रेसर होते. गावातील सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.




Petrol Price




