महत्वाच्या बातम्या

 ग्रामीण तरुणांसाठी शेतीवर आधारीत कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन


- सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन
- तालुका निहाय असणार ५ निवासी प्रशिक्षण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्यावतीने शेती आणि संबंधित क्षेत्रांमध्ये स्वयंरोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी  आणि उद्योजकता विकासाला चालना देण्यासाठी ग्रामीण तरुणांकरीता २५ दिवशीय तालुकानिहाय ५ निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षण ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना शेतीमध्ये आत्मनिर्भय बनविण्यासाठी  आणि कृषी उद्योजकतेची गोडी निर्माण करण्यासाठी आहे. सदर २५ दिवशीय  निवासी प्रशिक्षण निशुल्क असणार आहे.  प्रशिक्षणामध्ये २० ते ४० वयोगटातील युवक सहभागी होऊ शकतात. प्रति तालुका ५ या प्रमाणे एकुण प्रशिक्षणार्थी ४० असून प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र सेलसुरा येथे घेण्यात येणार आहे.

प्रशिक्षणामध्ये फळे व भाजीपाला पिकांसाठी जैविक निविष्ठा तयार करणे, ट्रायकोकार्ड तयार करणे, गांडूळ खत युनिट, १० ड्रम थेअरी व इतर निविष्ठा, फळे व भाजीपाला हायड्रोपोनिक्स आणि ॲक्वापोनिक्स तंत्रज्ञान, मातीविना आधुनिक पध्दतीने आणि कमी जागेत पिके घेणे, फळे भाजीपाला मध्ये ठिंबक व तुषार सिंचन तंत्रज्ञानाद्वारे पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी आधुनिक सिंचन पध्दती, फळे भाजीपाला प्रक्रिया  जॅम, जेली, सॉस आणि वाळलेले पदार्थ तयार करणे, शेती यंत्रसामुग्री दुरुस्ती व देखभाल, फळेभाजीपाला रोपवाटीका तयार करणे, फळे व भाजीपाला परागीकरण करीता मधुपक्षिक पालन आदी विषयाचा समावेश असणार आहे, असे आत्माच्या प्रकल्प संचालकांनी कळविले आहे.





  Print






Related Photos