तीन जीव घेतल्यानंतर टी-१२२ वाघाला जेरबंद करण्याचे आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्रात मानव-वाघ संघर्षाच्या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू आणि एक जण गंभीर जखमी झाल्यानंतर वनविभागाने नर वाघ टी-१२२ याला जेरबंद करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव रक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी २४ सप्टेंबर रोजी आदेश जारी केला असून, तज्ज्ञ पथकाच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
१ ऑगस्टपासून सावली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्याच्या चार गंभीर घटना घडल्या. १ ऑगस्ट रोजी सामदा येथील हिरामण साखरे यांचा बळी गेला. २६ ऑगस्ट रोजी केरोडा येथील नामदेव कुकुडकर यांच्यावर हल्ला होऊन ते गंभीर जखमी झाले. १६ सप्टेंबर रोजी निलसनी पेटगाव येथील वासुदेव वाकुडकर, तर २१ सप्टेंबर रोजी सामदा येथील हेमंत भुर्से यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. याशिवाय या परिसरात वाघाने २३ पशुधनांची शिकार केली आहे.
व्याहाड बु., सामदा, सोनापूर, निलसनी पेटगाव, कापसी, कढोली, सिरसी, साखरी, जिबगाव, पेटगाव, जांब बु., पेटगाव रै. केरोडा, हरंबा, उमरी, डोनाळा आणि उपरी या गावांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे. शेतशिवार तसेच रस्त्यांच्या परिसरात टी-१२२ वाघाचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मानव-वाघ संघर्षाच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी गठित समितीने संबंधित वाघाला कायमस्वरूपी पकडण्याची शिफारस केली होती. परिसरात वाघांची संख्या अधिक असून, भविष्यात आणखी मानव-वाघ संघर्ष होण्याची शक्यता असल्याचे समितीने नमूद केले आहे.
दरम्यान, वाघाला पकडण्यासाठी वनविभागाकडून पिंजरे लावण्यात आले असून, त्याच्या हालचालींवर कॅमेरा ट्रॅपद्वारे लक्ष ठेवले जात आहे. वनविभागाचे पथक परिसरात चोवीस तास गस्त घालत असून, नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जात आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी सांगितले की, टी-१२२ वाघाला जेरबंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा वाघ दोन वेळा पिंजऱ्याजवळ आला; मात्र पिंजऱ्यात न जाता पुन्हा जंगलात निघून गेला. त्यामुळे आता तज्ज्ञ पथकाच्या मदतीने भुलीचे इंजेक्शन देऊन वाघाला जेरबंद करण्याची तयारी सुरू आहे. हा वाघ वयस्कर असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाघाला पकडताना त्याला कमीत कमी त्रास होईल, तसेच मानवी संपर्कामुळे त्याच्या नैसर्गिक वर्तनावर परिणाम होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जेरबंद केल्यानंतर वाघाची पशुवैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून, त्याच्या आरोग्याचा आढावा घेतल्यानंतर योग्य नैसर्गिक अधिवासात स्थलांतर करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. टी-१२२ वाघाला पकडण्याचा आदेश ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे.




Petrol Price




