महत्वाच्या बातम्या

 जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्हयातील युवकांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी युवकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी १ मे महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावर युवा पुरस्कार शासनामार्फत देण्यात येतात. यंदाच्या युवा पुरस्कारासाठी जिल्हयातील युवक, युवती व संस्थांनी ५ मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हा पुरस्कार जिल्हास्तरावर युवक व युवती आणि एका नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. या पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार दहा हजार रुपये (प्रती युवक व युवती) व संस्थेसाठी गौरव पत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम पन्नास हजार रुपये अशा स्वरुपाचा असेल.

अर्जदार युवक, युवतींचे वय पुरस्कार वर्षातील १ एप्रिल रोजी १३ वर्षे पूर्ण व ३१ मार्च रोजी ३५ वर्षापर्यंत असावे. जिल्हा पुरस्कारासाठी जिल्हयात १० वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. हा पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागातून दिला जाणार नाही. पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफीती व फोटो ई.)

अर्जदार युवक व युवती पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार व्यक्तीने हे कार्य स्वयंस्फूर्तीने केलेले असावे. एका जिल्हयात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्हयात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.  केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी या पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत. अर्जदाराने पोलीस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला (संबंधित परिक्षेत्रातील पोलीस स्टेशन) देणे आवश्यक राहील.

जिल्हयातील युवक, युवती व संस्थांनी ५ मार्चपर्यंत एका प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर येथे सिलबंद लिफाफ्यात अर्ज सादर करावेत. अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्ल्वी धात्रक यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos