व्यवसाय सुरु करण्यास वैयक्तिक महिलांना व बचत गटातील महिलांना कर्ज व कर्जावर अनुदान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहर महानगर पालिकेतर्फे वैयक्तिक तसेच बचत गटातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज व कर्जावर अनुदान देण्यात येणार आहे. ९ नोव्हेंबर रोजी मनपा सभेत मंजुर ठरावानुसार दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत बँकेमार्फत प्राप्त कर्जावर अनुदान देण्यात येणार आहे. वैयक्तिक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत विविध बँकेमार्फत रु.२ लक्ष पर्यंत कर्ज देण्यात येते. यामध्ये ७ टक्क्यांवरील व्याजावर या योजनेमधुन व्याज अनुदान देण्यात येते. महानगर पालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार महिला लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या कर्जावर २५ टक्के किंवा ज्यास्तीत ज्यास्त रु. २५,०००/- अनुदान २ वर्षात विभागुन देण्यात येणार आहे. तसेच महानगर पालिका अंतर्गत स्थापन महिला बचत गटाला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याकरीता दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत विविध बँकेमार्फत रु. १० लक्ष पर्यंत कर्ज दिल्या जाते. यामध्ये ७ टक्केवरील व्याजावर या योजनेमधुन व्याज अनुदान देण्यात येते. मनपाने घेतलेल्या निर्णयानुसार महिला बचत गटांना मंजूर झालेल्या कर्जवर २५ टक्के किंवा ज्यास्तीत ज्यास्त रु.५०,०००/- अनुदान २ वर्षात विभागुन देण्यात येणार आहे. या योजनेमुळे शहरातील बचत गटातील व वैयक्तीक महिला व्यावसायिकांना किंवा ज्या महिला नवीन व्यवसाय सुरु करू इच्छीत आहे परंतु भांडवलाच्या कमतरतेमुळे त्या आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकत नाही अश्या महिलांना तसेच ज्या एकल, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत व अति दुर्बल घटकातील आहेत त्यांना या अनुदानाच्या माध्यमातुन बँकेमार्फत कर्ज घेऊन व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहीत करता येईल. महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला तर तिच्या कुटुंबाला फार मोठे आर्थिक साहाय्य प्राप्त होते तसेच कुटुंबातील सदस्यांचा विकास सुद्धा होतो. महिलांसाठी रोजगार निर्मिती व महिला व बाल सक्षमीकरणासाठी सदर योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे.
News - Chandrapur