बल्लारपूरच्या आरुषची गोव्यात सुवर्णकामगिरी : पेटॅथलॉनसह मिडले रिलेमध्येही बाजी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : क्रीडा क्षेत्रात बल्लारपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेचा युवा खेळाडू आरुष अंकुश चव्हाण याने गोवा येथील बांबोलीन स्टेडियमवर झालेल्या ३७ व्या वेस्ट झोन ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत पेटॅथलॉन प्रकारात सुवर्णपदक पटकावले. यासोबतच महाराष्ट्र मिडले रिले प्रकारातही सुवर्णपदक मिळवून आरुषने आपल्या क्रीडा कौशल्याची छाप उमटवली.
२९ सप्टेंबर रोजी झालेल्या पेटॅथलॉन स्पर्धेत लॉंग जंप, शॉटपुट अर्थात गोळाफेक, हर्डल्स आणि ६० मीटर धावणे यांसह विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. या सर्व प्रकारांमध्ये खेळाडूने केलेल्या कामगिरीनुसार गुण देण्यात येतात आणि त्याच्या एकत्रित गुणांवर अंतिम निकाल निश्चित केला जातो. आरुषने या सर्व प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करीत अव्वल स्थान मिळविले.
या स्पर्धेत महाराष्ट्रातून पेटॅथलॉनमध्ये सुवर्णपदक मिळविणारा आरुष हा एकमेव खेळाडू ठरल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, मिडले रिलेच्या शर्यतीतही महाराष्ट्राच्या संघाने सुवर्णपदक पटकावले असून त्यात आरुषचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला. आरुषच्या या यशामागे नियमित सराव, जिद्द आणि अथक मेहनतीचा मोठा वाटा आहे. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या पटांगणावर तो नियमित सराव करतो. स्पर्धेची तयारी करताना त्याने सातत्याने आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यावर भर दिला. त्याच्या या मेहनतीचे फलित गोव्यातील स्पर्धेत दोन सुवर्णपदकांच्या रूपाने समोर आले.
आपल्या यशाचे श्रेय आरुषने आई-वडील आणि मार्गदर्शकांना दिले. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सातत्याने मेहनत आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आई-वडील तसेच मार्गदर्शकांचे योग्य मार्गदर्शन हे यशाच्या प्रवासात अत्यंत महत्त्वाचे ठरते, असे आरुषने सांगितले.
आगामी स्पर्धांसाठी आणखी मेहनत घेऊन आपली कामगिरी उंचावण्याचा निर्धार आरुषने व्यक्त केला आहे. त्याच्या या यशाबद्दल बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रमोद आवते, पदाधिकारी आणि सदस्यांनी अभिनंदन केले असून भविष्यातील स्पर्धांसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.




Petrol Price




