देसाईगंज पोलिसांची दारू तस्करांवर कारवाई, ६ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी / मोरगाव मार्गे देसाईगंजकडे पिक अप वाहनातून दारू तस्करी करीत असल्याची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी सापळा रचून वाहनासह ६ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वाहनचालक आकाश योगराज ओंकार रा. महाजनटोला ता. गोरेगाव व प्रविण रमेश बघेल रा. कुंभारटोली मालवीय वार्ड गोंदिया, संतोष बगमारे रा. गोंदिया याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल १९ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास पोलिस निरीक्षक प्रदिप लांडे, सहाय्यक फौजदार दयानंद नागरे, सदाशिव धांडे, भावेश वरगंटीवार, संतोष नागरे यांनी अर्जुनी व कुरखेडा मार्गावरील टी पाईंटजवळील वनविभागाच्या नाक्याजवळ सापळा रचला. यावेळी एमएच २८ एबी ७७० क्रमांकाचे पिक अप वाहन येताना दिसले. वाहन थांबवून चौकशी केली असता वाहनात ४ लाख ३२ हजार रूपयांची देशी दारू आढळून आली. पोलिसांनी कारवाई करून आरोपी व वाहन ताब्यात घेतले. आरोपींविरूध्द मुुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रदिप लांडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-20


Related Photos