पोषण माह अभियान समारोपातून महिला सुरक्षा : बालसंरक्षण व पोषणाबाबत जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बालाजी वॉर्ड येथील माळी समाज भवनात ९ ऑक्टोबर रोजी पोषण माह अभियान समारोप व सेवा संकल्प अभियानानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महिलांचे आरोग्य, बालकांचे संरक्षण, महिला सुरक्षा आणि पोषणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करून समाजात सकारात्मक संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती मनस्विनी गिऱ्हे, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदक्कर, अंगणवाडी पर्यवेक्षिका साधना मेश्राम, सखी वन स्टॉप सेंटरच्या कल्याणी रायपुरे यांच्यासह नागरी प्रभागातील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
कार्यक्रमानिमित्त पाककला स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उपस्थित महिलांना संतुलित आहाराचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता आणि मानसिक आरोग्य संतुलन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच बालसंरक्षण, बालविवाह प्रतिबंध, बालकांचे हक्क, महिला सुरक्षा तसेच शासनाच्या विविध सेवा व योजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
बालविवाहामुळे मुलींच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, शिक्षणातील अडथळे, सामाजिक समस्या आणि कायदेशीर परिणाम याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली. बालकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय, अत्याचार किंवा शोषण होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच संकटग्रस्त महिला व मुलींना सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध होणारे समुपदेशन, कायदेशीर मार्गदर्शन, वैद्यकीय मदत आणि अन्य आवश्यक सहाय्य याबाबतही माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत उपस्थितांनी शपथ घेतली. महिला सक्षमीकरण, बालकांचे हक्क, मुलींचे शिक्षण आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकीचा आणि जनजागृतीचा सकारात्मक संदेश देण्यात आला.




Petrol Price




