महत्वाच्या बातम्या

 ओझोनच्या छिद्रात घट : २०६६ पर्यंत ओझोन थर पूर्णपणे पूर्ववत होण्याची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर दरवर्षी निर्माण होणाऱ्या ओझोनच्या छिद्राचा आकार २०२४ मध्ये तुलनेने कमी राहिला असून, ओझोन थराच्या पुनर्प्राप्तीचे आशादायी संकेत मिळाले आहेत. नासा आणि अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) या संस्थांच्या शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, ओझोन थराची स्थिती सुधारत राहिल्यास २०६६ पर्यंत तो पूर्णपणे पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

७ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर या ओझोन क्षयाच्या प्रमुख कालावधीत २०२४ मधील ओझोन छिद्राचा विस्तार १९९२ पासूनचा सातवा सर्वांत कमी विस्तार ठरला. १९९२ मध्ये ओझोन थराला हानी पोहोचविणाऱ्या रसायनांचे उत्पादन व वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्यासाठी ऐतिहासिक मॉन्ट्रियल प्रोटोकॉलची अंमलबजावणी सुरू झाली होती.

२०२४ मध्ये अंटार्क्टिक प्रदेशातील ओझोन कमी झालेल्या भागाचे मासिक सरासरी क्षेत्रफळ जवळपास २० दशलक्ष चौरस किलोमीटर होते. हा प्रदेश अमेरिकेच्या सलग भूभागाच्या जवळपास तिप्पट आहे. २८ सप्टेंबर रोजी ओझोन छिद्राने वर्षातील सर्वाधिक एकदिवसीय विस्तार गाठत सुमारे २२.४ दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले.

शास्त्रज्ञांच्या मते, ओझोनची एकाग्रता ऐतिहासिकदृष्ट्या निश्चित केलेल्या २२० डॉबसन युनिट्सच्या मर्यादेपेक्षा कमी झालेला भाग ओझोन छिद्र म्हणून ओळखला जातो. २०२४ मध्ये ओझोनच्या हानीच्या तीव्रतेतही तुलनेने सुधारणा दिसून आली.

ओझोन थरातील या सकारात्मक बदलामागे वातावरणातील हानिकारक क्लोरोफ्लोरोकार्बन (CFC) रसायनांचे प्रमाण सातत्याने कमी होत जाणे हे प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर अंटार्क्टिकाच्या उत्तरेकडील भागातून हवेच्या प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणात ओझोन दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचल्यानेही यंदा ओझोन छिद्राचा आकार कमी राहण्यास मदत झाल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.

ओझोन थर पृथ्वीवरील जीवसृष्टीला सूर्याच्या धोकादायक अतिनील किरणांपासून संरक्षण देतो. त्यामुळे ओझोन थराची होत असलेली सुधारणा ही संपूर्ण पृथ्वीसाठी दिलासादायक आणि पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना मिळालेले महत्त्वपूर्ण यश असल्याचे ग्रीन प्लॅनेट, चंद्रपूरचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.





  Print






Related Photos