महत्वाच्या बातम्या

 ग्राहक चळवळीच्या माध्यमातुन ग्राहकांना शिक्षीत करण्याचा वसा घ्यावा


-  जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : ग्राहक चळवळीच्या माध्यमातुन ग्राहकांना शिक्षीत करण्याचा वसा सर्वांनी घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हापुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमात केले. नुकताच राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडला. त्या कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून मार्गदर्शन करतांना ते  बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी तर प्रमुख अतिथी सदस्य, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नितीन घरडे, सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग श्रीमती वृषाली जागीरदार, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सदस्य नितीन काकडे व प्रा. डॉ. जयश्री संजय सातोकर आदि उपस्थित होते.
यावेळी वंजारी यांनी ग्राहक संरक्षण कायदयाची निर्मिती कशी झाली ते सविस्तर सांगितले. प्राचीन काळापासून ते भारत स्वतंत्र झाल्यानंतर ग्राहक संरक्षणासाठी प्रचलीत असलेल्या महत्वाच्या दस्ताऐवजाच्या आधारे ग्राहक हक्कासंबंधी व कायदयातील तरतूदी संदर्भात माहिती दिली. तसेच Consumer Protection Act- 2019 मधील कलमांची माहिती दिली.
असर फॉऊन्डेशन तर्फे पथनाटयाव्दारे तसेच विविध विभागांमार्फत प्रदर्शनीद्वारे ग्राहक जन जागृतीबाबत प्रबोधन करण्यात आले. नितीन काकडे यांनी ग्राहक हक्काचा इतिहास याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रा. डॉ. जयश्री सातोकर यांनी ग्राहक संघटना स्थापन करण्यामागे अखिल भारतीय ग्राहक पंचायत या संघटनेचा मोलाचा वाटा असल्याचे तसेच दैनंदिन व्यवहारात ग्राहकांची कशी फसवणूक होते व त्यावेळी ग्राहकांनी कसे जागृत असावे याबाबत मार्गदर्शन केले. क्षेत्रीय परिवहन अधिकारी सुरज पवार यांनी रस्त्यावर वाहन चालवितांना स्वतःची काळजी कशी घ्यावी याबाबत विद्यार्थांना खेळीमेळीच्या वातावरणात मोलाचे मार्गदर्शन केले.
सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नितीन घरडे यांनी यावर्षी असलेल्या ग्राहक दिनाच्या संकल्पनेबददल (Effective Disposal of Cases in Consumer Commission) योग्य पध्दतीने मार्गदर्शन केले. श्रीमती वृषाली जागीरदार यांनी ग्राहक हक्काबाबत मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी सुरक्षेचा हक्क, माहितींचा हक्क, समस्या मांडण्याचा हक्क तसेच वस्तु खरेदी करतांना हॉल मार्क कडे लक्ष देवुनच वस्तु खरेदी केली पाहीजे असे त्यांनी सांगितले.





  Print






News - Bhandara




Related Photos