महत्वाच्या बातम्या

 रानटी हत्तीचा मंजेवाड्यात धुमाकूळ : १२ एकरांतील धानपीक केले उद्ध्वस्त


- ऐन कापणीच्या हंगामात शेतकऱ्याचे मोठे नुकसान; अनिल सोरते यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. रानटी हत्तींकडून शेतातील उभ्या पिकांची नासधूस करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. दरम्यान, मंजेवाडा येथे एका रानटी हत्तीने धुमाकूळ घालत शेतकरी अनिल खट्टू सोरते यांच्या तब्बल १२ एकर शेतातील धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. ऐन कापणीच्या हंगामात ही घटना घडल्याने शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांपासून शंकरनगर-मंजेवाडा जंगल परिसरात एका रानटी हत्तीचा वावर आहे. या हत्तीने मंजेवाडा येथील शेतकरी अनिल सोरते यांच्या शेतात प्रवेश करून संपूर्ण शेतातील उभे धानपीक तुडविले. सोरते यांनी आपल्या १२ एकर शेतात अ दर्जाच्या धानाची लागवड केली होती. पीक चांगले बहरले असून कापणीच्या तयारीत असतानाच हत्तीने शेतात शिरून मोठ्या प्रमाणात नासधूस केली.

शेतीच्या मशागतीपासून ते लागवड, खते, औषध फवारणी आणि मजुरीपर्यंत मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी धानपीक उभे केले होते. मात्र, रानटी हत्तीच्या एका धुडगुसामुळे संपूर्ण हंगामाचे नियोजन कोलमडले आहे. अपेक्षित उत्पन्न मिळण्याच्या आशेवर असलेल्या सोरते यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, हाती आलेला घास हिरावल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

हत्तींचा वाढता वावर; शेतकऱ्यांचे उपायही निष्फळ -
शंकरनगर-मंजेवाडा परिसरात रानटी हत्तींचा वावर वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करीत आहेत. शेताजवळ होळ्या पेटविणे, फटाके फोडणे तसेच शेताभोवती झटका मशीनचे तारकुंपण उभारणे असे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, हत्तींच्या उपद्रवापुढे हे उपायही निष्फळ ठरत असल्याचे चित्र आहे.

नुकसानभरपाई देण्याची मागणी -
रानटी हत्तींकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. मंजेवाडा येथील नुकसानग्रस्त शेताची वनविभागाने तातडीने पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा आणि नियमानुसार भरपाई मिळवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच हत्तींच्या वाढत्या वावरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.





  Print






Related Photos