महत्वाच्या बातम्या

 समग्र प्राथमिक आरोग्य सेवेसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा


-  माझे गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत हिंगणी येथे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वर्धा : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माझे गाव, आरोग्य संपन्न गाव या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, हिंगणी येथे ‘कसं काय’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने २ व ३ सप्टेंबर रोजी समग्र प्राथमिक आरोग्य सेवा विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक, सुलभ व लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. अधिक उपचार, कमी रेफरल या संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन प्रशिक्षणादरम्यान करण्यात येत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून हा प्रशिक्षण कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजसिंह पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नलिनी विखे तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वंदना वावरे, बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय गाठे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सुरेश चांडोळकर, एनसीडी समन्वयक डॉ. माधुरी निमसटकर, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत वाडीभस्मे, मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. सुदर्शन हरले, डीसिएम दिपाली चांडोळे, आरोग्स सहाय्यक गजानन थुल, आरोग्य सहायिका वंदना उईके आरोग्य शिक्षण व जनजागृती तसेच समुदायस्तरीय आरोग्य व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन करणार आहे.

गर्भवती व प्रसूतिपश्चात मातांची काळजी, नवजात शिशू व बाल आरोग्य, आजारांचे लवकर निदान व उपचार, आवश्यक संदर्भ सेवा तसेच गावपातळीवरील आरोग्य उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी याबाबतही प्रशिक्षण दिले जात आहे. तांत्रिक सत्रे, गटचर्चा आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण अधिक परिणामकारक करण्यात येत आहे. या प्रशिक्षणात जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका तसेच इतर आरोग्य कर्मचारी सक्रिय सहभाग घेत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा मिळावी, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.





  Print






Related Photos