महत्वाच्या बातम्या

 तुकूमच्या दाट वस्तीत रानकुत्र्याचा वावर : सीसीटीव्हीत कैद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील तुकूम परिसरात २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास रानकुत्र्याचा वावर आढळून आल्याने परिसरात कुतूहल निर्माण झाले. दाट लोकवस्तीच्या भागातून रानटी कुत्र्यासारखा दिसणारा वन्यप्राणी जाताना दिसल्याने सुरुवातीला तो लांडगा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्राणी रानकुत्रा असल्याचे स्पष्ट झाले.

तुकूम परिसरातील नागरिक पंकज बेले यांना सर्वप्रथम हा वन्यप्राणी दिसून आला. त्यानंतर हॅबिटाट कॉन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे व कार्यकर्त्यांनी बेले यांची भेट घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर संबंधित प्राणी रानकुत्रा असल्याचे स्पष्ट झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, राधाकृष्ण टॉकीज आणि सीटीपीएस जंगलाच्या दिशेने हा रानकुत्रा तुकूम परिसरात दाखल झाला. त्यानंतर तो पोलीस मैदानाच्या मागील बाजूच्या परिसराकडे गेल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी परिसरात शोध घेतला. मात्र, रानकुत्र्याचा ठावठिकाणा लागला नाही.

तो ज्या मार्गाने शहरात आला, त्याच मार्गाने पुन्हा जंगलाच्या दिशेने परतला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.चंद्रपूर शहरालगत जंगलाचे क्षेत्र असल्याने वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीजवळ वावर अधूनमधून आढळून येतो. रानकुत्रा हा जंगलातील महत्त्वाचा मांसाहारी वन्यप्राणी असून सामान्यतः कळपाने वावरतो. त्यामुळे शहरालगतच्या जंगलातून अशा वन्यजीवांची होणारी हालचाल आणि त्यांचे संभाव्य भ्रमणमार्ग यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, नागरिकांनी वन्यप्राणी आढळल्यास त्याच्या जवळ जाणे, पाठलाग करणे अथवा गर्दी करणे टाळावे. अशा प्रकारची घटना निदर्शनास आल्यास तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






Related Photos