अवैध रेती वाहतुकीवर एलसीबीची धडक कारवाई : ४० लाखांचा ट्रक जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या महेंद्र कंपनीच्या १६ चाकी पल्ला ट्रकवर कारवाई करत पोलिसांनी १० ब्रास रेतीसह एकूण ४० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, वाहनमालकाचा शोध सुरू आहे.
१० ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील पथकाला रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित परिसरात नाकाबंदी करून कारवाई केली. यावेळी एमएच ४० सीव्ही ९३३३ क्रमांकाच्या १६ चाकी पल्ला ट्रकमधून रेतीची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी कारवाईदरम्यान ट्रक, त्यातील १० ब्रास रेती आणि एक जुना वापरता मोबाईल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या महेंद्र कंपनीच्या १६ चाकी ट्रकची किंमत अंदाजे ४० लाख रुपये, रेतीची किंमत ६० हजार रुपये, तर मोबाईलची किंमत १० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारे एकूण ४० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी ट्रकचालक नवीनकुमार महाबीर सिंग (वय ४०), रा. फुलूटोला तफरदे, तालुका पुरैनी बाजार, जिल्हा मधेपुरा, बिहार याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. ११७३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), जमीन महसूल कायदा कलम ४८(७), ४८(८) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १७७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणातील वाहनमालक वाहिद झबीर शेख रा. उमरेड, ता. उमरेड, जि. नागपूर हा पाहिजे आरोपी असून, त्याच्याबाबत पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या उपविभाग राजुरा पथकाने केली.




Petrol Price




