महत्वाच्या बातम्या

 वर्धा पोलिसांचा ई-दरबार उपक्रम पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार


- पोलिस प्रदर्शनीचा समारोप व ई-दरबारचा शुभारंभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या समस्या, अडचणी कालमर्यादेत आणि विनात्रासाने सोडविण्यासाठी वर्धा पोलिसांनी सुरु केलेला ई-दरबार हा अतिशय चांगला उपक्रम आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना याद्वारे दिलासा मिळेल, असे प्रतिपादन वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

महाराष्ट्र पोलिस दलाच्या वर्धापन दिनानिमित्य पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात दोन दिवशीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीचा समारोप व ई-दरबारचा शुभारंभ पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, आ. दादाराव केचे, आ.डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलिस अधीक्षक नुरूल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बदलत्या काळात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फक्त पोलिस विभागाने काम करुन चालणार नाही तर यामध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. पोलिस विभागामध्ये सकारात्मक बदल घडून येत आहे. प्रदर्शनीमधील विविध स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होणार आहे. व्यसनाधिनतेला आळा बसण्यासाठी ही प्रदर्शनी उपयुक्त ठरणार असल्याचे पुढे बोलतांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपली कामे तसेच समस्या मांडण्यासाठी मुख्यालयी यावे लागतात. ई-दरबारच्या माध्यमातून मुख्यालयी न जाता प्रश्न मार्गी लागत आहे. पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांच्या संकल्पनेतून ई-दरबार हा अतिशय चांगला उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी पोलिस प्रशासनाचे अभिनंदन केले. यावेळी ई-दरबार माहिती पुस्तिकेचेही विमोचन करण्यात आले.

वर्धा पोलिसांच्यावतीने सायबर सुरक्षा, समाजमाध्यमांचा सुरक्षित वापर यासह विविध बाबींची नागरिकांना माहिती व्हावी याकरीता प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनीमध्ये पोलिसांचा सायबर विभाग, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, गृहरक्षक दल, अंमली पदार्थ विरोधी पथक, दामिनी पथक, वाहतूक विभाग, शस्त्र प्रदर्शनी, डॉग स्कॉड, भरोसा सेल, बिनतारी संदेश विभाग, बॉम्ब शोधक नाशक पथक यांच्यासह विविध दालने लावण्यात आली होती. यावेळी मान्यवरांनी विविध स्टॉलला भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी केले. संचलन व आभार प्रदर्शन स्मिता महाजन यांनी केले.





  Print






News - Wardha




Related Photos