महत्वाच्या बातम्या

 राजुरातील १७ टायर चोरीप्रकरणी मध्य प्रदेशातील दोघांना अटक : १० लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मालवाहू ट्रकचे टायर चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा राजुरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील आरोपी रामलाल गिरधारी यादव (वय २७) आणि अजय श्रीकाशी पेटल (वय ३०) या दोघांना अटक करण्यात आली आहे. रायपूर येथून कोळशाची वाहतूक करून राजुऱ्यात आलेल्या दोन ट्रकचे तब्बल १७ टायर डिस्कसह चोरीला गेले होते. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी चोरीचे १७ टायर आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राकेशकुमार देवीलाल रांगडाले (वय ४७), रा. रायपूर, छत्तीसगड) यांच्या एसव्हीए ट्रान्सपोर्टिंग कंपनीचे दोन ट्रक कोळशाची वाहतूक करण्यासाठी राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथील भाटिया कोल वॉशरीमध्ये आले होते. तेथील माल खाली केल्यानंतर दोन्ही ट्रक लॉयड्स मेटल येथील रेल्वे सायडिंगवर माल भरण्यासाठी रवाना झाले. मात्र, ९ ऑक्टोबरच्या रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास दोन्ही ट्रकचालकांचे मोबाईल फोन बंद झाले. त्यानंतर ट्रक माल भरण्यासाठी रेल्वे सायडिंगवर पोहोचले नसल्याची माहिती सुरक्षा पर्यवेक्षकांनी मालकाला दिली.

ट्रकचे जीपीएस लोकेशन तपासले असता ते रेल्वे सायडिंग परिसरातच असल्याचे दिसून आले. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता दोन्ही ट्रकचे टायर गायब असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. ट्रक क्रमांक सीजी २२ एके ७९८२ चे नऊ, तर सीजी २२ एके ९२०० चे आठ, असे एकूण १७ टायर डिस्कसह चोरीला गेले होते. या टायरची किंमत सुमारे अडीच लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.

मालवाहू ट्रक हे अनेक वाहतूक व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन असते. अशा वाहनांचे टायर चोरीला गेल्याने केवळ आर्थिक नुकसानच होत नाही, तर वाहतूक व्यवसायही ठप्प होतो. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राजुरा पोलिसांनी तपासाला वेग दिला. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहिती आणि सायबर सेलच्या तांत्रिक मदतीने आरोपींचा माग काढला. अखेर मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील चकौडिया परिसरातून दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेले १७ ट्रक टायर, किंमत दोन लाख ५० हजार रुपये, तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली एमपी १८ जीए ५८६७ क्रमांकाची बोलेरो पिकअप, किंमत सात लाख ५० हजार रुपये, असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे ट्रकचे टायर चोरी करणाऱ्या टोळीचे कृत्य उघडकीस आले असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक झाडोकर, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील धांडे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, अनुप डांगे, पोअं शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी, आकाश पिपरे, राजीब दुबे यांनी केले.

राजुरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा क्रमांक ७७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.





  Print






Related Photos