महत्वाच्या बातम्या

 कर भरा आणि वर्षभर फुकट दळून न्या : कर वसुलीसाठी अनोखी शक्कल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : वर्धा जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीने एक अनोखी शक्कल लढवली आहे.

ग्रामपंचायतीचे सर्व कर भरा आणि वर्षभर गिरणीतून मोफत धान्य दळून न्या अशी योजना ग्रामपंचायतीने राबवली आहे. ग्रामपंचायतीने वेगळी योजना राबवून एक नवा आदर्श उभा केला आहे.

स्वयंपाकासाठी लागणारे पिठ गिरणीतून दळून आणले जाते. पण हेच दळण गावकऱ्यांना वर्षभर मोफत मिळत असेल तर पर्वणीच म्हणावी लागेल. गावाला नि:शुल्क दळण दळून मिळण्याची ही संधी मनसावळी या वर्धा जिल्ह्यातील ग्राम पंचायतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. गावकऱ्यांना मोफत दळण दळून जर पाहिजे असेल तर मात्र ग्राम पंचायतीला शंभर टक्के कर भरणा करणे अत्यावश्यक आहे. या अटीवरच गावात ग्राम पंचायतने पुढाकार घेऊन उभारलेल्या पीठ चक्कीवर मोफत दळून दिले जात आहे. गावाच्या विकासासाठी आवश्यक असणारा निधी कर रुपात उभा केला जातो. पण अलीकडे कर भरण्याची प्रवृत्ती कमी झाल्याने मनसावळी ग्रामपंचायतीने शंभर टक्के कर भरा आणि वर्षभर मोफत दळण दळून घ्या ही संकल्पना सुरू केली आहे.

ग्रामपंचायतीच्या या संकल्पनेचा गावाला फायदा देखील व्हायला लागला आहे. नागरिक आपले घर आणि पाण्याचा टॅक्स भरून आपली जबाबदारी पूर्ण करू लागले आहे. घर कराची पावती गिरणीवर दाखवायची आणि आपले गहू, ज्वारी, बाजरी, डाळ आदी धान्य दळून न्यायचे, असाच नित्यनियम गावकरी पाळताना दिसत आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच प्रांजली मुकेश भोयर यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या प्रयोगाने कर गोळा होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. १ हजार २०० लोकसंख्या असलेल्या मनसावळी या गावात २०२१-२२ मध्ये १ लाख ५० हजार इतकी कर वसुली झाली होती. तर २०२२-२३ मध्ये १ लाख ९० हजार इतकी कराची वसुली झाली आहे. कर भरण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे.

चेंढरे ग्रामपंचायतीत स्कॅन करा आणि कर भरा

बदलत्या काळानुसार आता ग्रामपंचायतीचा कारभार देखील हायटेक झाला आहे. ग्रामपंचायतीत देखील नवे प्रयोग सध्या राबवले जात आहे. ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असावा, याकरता रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने अनोखी शक्कल लढवली आहे. ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी पूर्णपणे ऑनलाईन सुविधा दिली आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी क्यूआर कोड बनविण्यात आले आहे. चेंढरे ग्रामपंचायत ऑनलाईन सुविधा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. ग्रामपंचायतीच्या या प्रयोगाचे चांगलेच कौतुक होत आहे. ग्रामपंचायतीची घरपट्टी आणि पाणीपट्टी ऑनलाईन भरता येणार आहे. क्यूआर-कोड मुळे आजच्या काळात आर्थिक व्यवहार करणे हे सोपे झाले आहे. अलिबाग येथील चेंढरे ग्रामपंचयतीमध्ये प्रत्येक घरावर क्यूआर कोड लावण्यात आले आहे. क्यूआर कोड स्कॅन करून घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाईन सुविधा देणारी चेंढरे ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.





  Print






News - Wardha




Related Photos