महत्वाच्या बातम्या

 कचरा व्यवस्थापनाचे नेदरलँड देणार धडे : एमएमआरडीएचा सामंजस्य करार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाच्या शाश्वत नागरी विकासासाठी एमएमआरडीएने नेदरलँड सरकारच्या पायाभूत सुविधा आणि जलव्यवस्थापन खात्यासोबत ५ वर्षांसाठी सामंजस्य करार केला आहे. यामुळे एमएमआर क्षेत्रात एकात्मिक कचरा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक आणि चक्रिय अर्थव्यवस्थेसाठी नेदरलँडमधील तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन लाभणार आहे.

आर्थिक पाठबळही मिळणार आहे. पायाभूत सुविधांचा विकास करत असताना कचरा व्यवस्थापनही राबविण्यात येणार असून, या क्षेत्रात एमएमआर क्षेत्र एक आदर्श निर्माण करेल, अशी आशा एमएमआरडीएने व्यक्त केली आहे.

एमएमआरडीए पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक प्रकल्प राबवत आहे. जे हवामान बदल, वायू प्रदूषण, हरितगृह वायूंचे उत्सर्जन इत्यादींचे प्रतिकूल परिणाम कमी करून शहरी पायाभूत सुविधांना आकार देण्यास मदत करतील. कराराच्या निमित्ताने करण्यात आलेल्या संयुक्त घोषणेमध्ये स्मार्ट सिटी मास्टर प्लॅनिंग, एकात्मिक कचरा व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धतींचे सामायिकीकरणाचा समावेश आहे. या सहकार्यामुळे एमएमआर क्षेत्रात हवामान बदलाविरुद्धच्या लढाईत आणखी बळ मिळणार आहे.

कचऱ्याचे व्यवस्थापन आणि वातावरण बदलाशी निगडित अनेक समस्यांना सामोरे जाण्यासाठीची सिद्धता या सहकार्यामुळे आणखी बळकट होईल. या सहकार्यामुळे एमएमआर क्षेत्राचा उत्तम विकास करणे शक्य होईल. 

एमएमआर क्षेत्राचा शाश्वत विकास करणे हे एमएमआरडीएचे स्वप्न आहे. त्यासाठी प्रयत्न करत आहोत. एमएमआर क्षेत्राचा शाश्वत नागरी विकास करणे हा दृढ संकल्प असून, हा सहकार्य करार त्याच दृष्टीने उचललेले पाऊल आहे. एकूणच काय तर हा सहकार्य करार एमएमआर क्षेत्राच्या शाश्वत विकासाच्या आमच्या प्रयत्नांना अधिक चालना देणारा ठरेल.  

एमएमआरडीएने मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्र आणि त्याच्या आसपासच्या भागात शाश्वत नागरी विकासाचे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवले आहे.

  Print


News - Rajy
Related Photos