पोटच्या मुलीवर सतत तीन वर्षे अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला पंधरा वर्षे कारावास
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : पोटच्या मुलीवर सतत तीन वर्षे अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोक्सो कायद्याअंतर्गत पंधरा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. योगेश (नाव बदलेले) असे या नराधम बापाचे नाव आहे. योगेश हा शाळेत शिपाई होता तर त्याची पत्नी परिचारिका होती. त्यांना एक मुलगी होती. पत्नी कामासाठी बाहेर गेल्यावर तो मुलीवर अत्याचार करीत असे.
मुलगी १३ वर्षांची होईस्तोवर अत्याचार सुरू होता. या प्रकाराची सुरुवात होताच मुलीने आईकडे तक्रार केली होती. मात्र, योगेशने तिला धमकावले व आपण जे काही सांगितले ते खोटे होते, असे सांगण्यास बाध्य केले. मुलीनेही तसेच केल्याने आईने ही तक्रार खोटी असल्याचे गृहीत धरले. परंतु, पुढे तीन वर्षे हा प्रकार सुरूच राहिला. अखेर या मुलीने तिच्या शाळेतील शिक्षिकेला हा प्रकार सांगितला.
शाळा व्यवस्थापनाने तिच्या आईला बोलावून ही माहिती दिली. यावर आईने आरोपीवर पाळत ठेवण्याचे ठरवले. तिने १५ डिसेंबर २०१६ रोजी घरीच राहून या सगळ्या प्रकाराचे चित्रीकरण केले. मात्र, योगेश आणि तिच्या नातेवाईकांच्या दबावाखाली तिने तक्रार दिली नाही. सगळी परिस्थिती माहिती असतानासुद्धा आईने तक्रार न दिल्याने पीडित मुलगी वैफल्यग्रस्त झाली. तिचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले. आईने तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केले. अखेर चाईल्ड हेल्प लाईनच्या मदतीने आईने हिंमत करून जवळपास वर्षभरानंतर २० जानेवारी २०१८ रोजी पोलीस तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाअंती आरोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सरकारी वकील वर्षा सायखेडकर यांनी सरकारची बाजू मांडली.
News - Nagpur