गडकरी, तुमाने यांना हायकोर्टाने बजावली नोटीस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर मतदार संघ आणि शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्या रामटेक मतदार संघातील निवडणुकीला आव्हान देणाऱ्या दोन स्वतंत्र याचिकांवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन्ही खासदारांना नोटीस बजावली आहे. त्यावर आठ आठवड्यांत उत्तर सदर करण्याचा आदेश देण्यात आला आहे .
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर मतदार संघातील विजयावर आक्षेप घेताना काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. त्यासोबतच नितीन गडकरी यांनी भारतीय लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदींचे पालन केलेले नाही, असे याचिकेत नमूद केले आहे. नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रचारावर केलेल्या खर्चाचा हिशेब सादर केलेला नाही. इतर उमेदवारांचे प्रत्येक टप्प्यातील खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सार्वजनिक केला आहे. परंतु, गडकरी यांच्या खर्चाचा एकच आकडा दिलेला आहे. त्यामुळे सदर बाब बेकायदा ठरते, असा दावा याचिकेत केला आहे. त्यासोबतच गडकरी हे निवडणूक आचारसंहितेच्या काळात रोकडे ज्वेलर्सच्या नव्या शोरूमच्या उद्घाटनाला गेले होते. त्या शोरूमच्या अनेक जाहिराती प्रकाशित झाल्या होत्या. परंतु, गडकरी यांच्या निवडणूक खर्चात त्याबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही, अथवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याबाबत जाबही विचारला नाही, असा दावा याचिकेत केला आहे. अनेक मतदान केंद्रांवर प्रत्यक्षात झालेले मतदान आणि ईव्हीएमच्या मोजणीतील मतदान याच्या आकडेवारीत तफावत असल्याचाही आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सदर निवडणूक बेकायदा घोषित करावी, अशी विनंती करण्यात आली. 
दरम्यान, कृपाल तुमाने यांच्या निवडणुकीवर आक्षेप घेताना किशोर गजभिये यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे वैधानिक दायित्व पार पाडले नसल्याचा आरोप केला आहे. निवडणुकीपूर्वी रामटेक मतदार संघात सुमारे १८४ इव्हीएममध्ये दोष आढळून आला होता. याशिवाय प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर झालेल्या मॉक मतदानातही मशिन्समध्ये दोष दिसला होता. तरीही त्या ईव्हीएम बदलण्यात आलेल्या नाहीत, असा दावा याचिकेत केला आहे. काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, रामटेक व कामठी येथील मतदारसंघातदेखील मोठ्या संख्येने ईव्हीएम खराब असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्याबाबत रितसर तक्रार केल्यानंतरही त्याची दखल घेण्यात आलेली नाही, असा दावा करण्यात आला आहे. 
सदर दोन्ही याचिकांवर सुनावणी करताना हायकोर्टाने नितीन गडकरी आणि कृपाल तुमाने यांना नोटीस बजावली असून, आठ आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. किशोर गजभिये यांच्या वतीने ॲड. प्रदीप वाठोरे यांनी बाजू मांडली. 
  Print


News - Nagpur | Posted : 2019-08-07


Related Photos