महत्वाच्या बातम्या

 कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू : एक गंभीर जखमी


- वडद फाट्याजवळ मोटारसायकल आणि कारची समोरासमोर धडक; कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : साकोली येथून बारव्हा गावाकडे जाणाऱ्या मोटारसायकलला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना साकोली परिसरातील वडद फाट्याजवळ घडली. या प्रकरणी पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहन गोपीचंद सोनवणे वय २८ आणि निकेश सुधाकर उईके वय २५, दोघेही रा. तावशी, ता. लाखांदूर हे मोटारसायकल क्रमांक एमएच ४० सीबी ३५८७ ने काही कामानिमित्त साकोली येथे आले होते. काम आटोपल्यानंतर दोघेही सायंकाळच्या सुमारास आपल्या गावाकडे परत जात असताना वडद फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच ३१ ईके ४७२७ क्रमांकाच्या कारने त्यांच्या मोटारसायकलला समोरासमोर जोरदार धडक दिली.

या अपघातात मोटारसायकलवरील रोहन सोनवणे आणि निकेश उईके हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, निकेश उईके यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रोहन सोनवणे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

या घटनेमुळे तावशी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातप्रकरणी पोलिसांनी संबंधित कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अपघाताच्या कारणांचा पुढील तपास सुरू आहे.





  Print






Related Photos