महत्वाच्या बातम्या

 आचार्य विनोबा भावे रूग्णालयात कॅथ लॅब, जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरचा शुभारंभ


- गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी संस्थेच्या प्रकल्पांना सर्वतोपरी सहकार्य करू :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेतर्फे कॅथ लॅब, जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरसारख्या अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. शासकीय योजनांची सांगड घालून सुविधांचा लाभ विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील रूग्णांना होत आहे. गोरगरीब रूग्णांच्या सेवेसाठी संस्थेच्या पुढील काळातील प्रकल्पांना शासनातर्फे आवश्यक ते सर्व सहकार्य करू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेतर्फे सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात कॅथ लॅब, जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त संस्थेच्या सभागृहात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. संस्थेचे कुलपती दत्ता मेघे, खासदार रामदास तडस, आ.समीर मेघे, सागर मेघे, जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, कुलगुरू डॉ. ललित वाघमारे आदी उपस्थित होते.

मुखमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संस्थेच्या रुग्णालयात कोविडकाळात गोरगरीब रुग्णांसाठी सातत्यपूर्ण सेवा देण्यात आली. अनेक अद्ययावत सुविधा येथे उभारण्यात आल्या आहेत. सुविधेअभावी शस्त्रक्रियेपासून वंचित राहणा-या गोरगरीब रूग्णांसाठी मोठी सुविधा कॅथ लॅब, जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरमुळे  निर्माण झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नई शिक्षा नई नीती प्रणालीनुसार उच्च शिक्षण मातृभाषेतून मिळावे, असा आग्रह धरला. त्यानुसार संस्थेतर्फे राबवलेला औषधशास्त्राच्या तत्वांचा मराठी अनुवादाचा उपक्रम कौतुकास्पद आहे.

संस्थेच्या वाटचालीची माहिती कुलपती मेघे यांनी दिली. ते म्हणाले की, कुठलाही रूग्ण पैश्यांअभावी आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये, म्ह्णून संस्थेतर्फे गत ३० वर्षांपासून कार्य केले जाते. ही गोरगरीबांची हक्काची संस्था आहे. शिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांनाही वेळोवेळी मदत केली जाते. याच तत्वाची जोपासना यापुढेही होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.   

संस्थेतील एम. डी. (औषधशास्त्र) अभ्यासक्रमातील मार्गदर्शक तत्वांच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. डॉ. स्वानंद पाठक, डॉ. निशिकांत इंगोले, डॉ. रूपेश वरभे यांनी हा अनुवाद केला आहे. अधिष्ठाता अभय गायधने, सुनीता वाघ, तृप्ती वाघमारे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. डॉ. वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. मेघे यांनी आभार मानले.





  Print






News - Wardha




Related Photos