महत्वाच्या बातम्या

 गणपती बाप्पा मोरया या जयघोषात जात-पात विरहित समाजाचे वर्णन : ना. सुधीर मुनगंटीवार


- जिल्ह्यातील गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरित

- मुंबई येथील कलावंतांचा संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

- चंद्रपूर जिल्ह्याला देशात बहूमान मिळवून देण्यासाठी कटिबद्ध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : गणपती बाप्पा मोरया असा जयघोष केल्यानंतर आपल्यामध्ये ऊर्जा संचारते. पण हा जयघोष केवळ एका सणापुरता मर्यादित नसून त्यामध्ये जात-पात-धर्म विरहित समाजाचे वर्णन आपल्याला बघायला मिळते. लोकमान्य टिळकांनी ज्या भावनेतून घरातील गणेशपुजा सार्वजनिक स्वरुपात सुरू केली, त्या राष्ट्रभक्तीच्या भावनेनेही जात-पात-धर्माची बंधने मोडून काढली होती. आपणही याच भावनेतून हा उत्सव दरवर्षी साजरा करावा आणि याचे स्वरुप अधिक मोठे करावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याच पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चंद्रपूर जिल्ह्यासाठी आयोजित गणेशोत्सव स्पर्धेचा पुरस्कार वितरण व संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम सोहळा क्लब ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आला. त्यावेळी ना. मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, गुरूदेव सेवा मंडळाचे लक्ष्मणराव गमे, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टुवार, काशी सिंग, समीर केने, प्रविण मोहुर्ले, नंदू रणदिवे, किशोर कापगते, प्रभाकर भोयर, चंदू आष्‍टनकर, चंदू मारगोनवार, सूरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कार विजेत्या गणेश मंडळांचे त्यांनी अभिनंदन केले. याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजन स्पर्धेतील विजेत्यांचेही त्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमात बेबस चित्रपटाच्या जाहिरात फलकाचे अनावरणही ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. गणराज रंगी नाचतो या मुंबई येथील ५० कलावंतांच्‍या भव्‍य संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

ना. मुनगंटीवार म्हणाले, सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून गेल्यावर्षी मी पहिल्यांदा गणेश उत्सवाची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली. यावर्षीही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर, मुल, बल्‍लारपूर इथे भाजपच्या वतीने हे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सव हा आनंदाचा सण आहे. या सणाला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अनमोल भाव बघायला मिळतात. एक सूर, एक गीत प्रत्येकाच्या ओठांवर असते. त्यावेळी जात-पात-धर्म बघितला जात नाही. चंद्रपूरमध्ये याच भावनेतून हा उत्सव साजरा होत असतो. इथे गणेशोत्सव साजरा होतो तेव्हा सगळ्या धर्मांचे लोक सहभागी होतात, याचा मला अभिमान आहे. चंद्रपूरचा नागरिक म्हणून देशासाठी आपण या जिल्ह्याचे योगदान देऊ शकलो, याचा अभिमान असल्याचेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

भारत-पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पाकिस्तानच्या दिशेने तलवार घेऊन उभा असलेल्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले. त्या क्षणाला माझे उर अभिमानाने भरून आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांसाठी लंडनमध्ये जाऊन करार केला तेव्हा चंद्रपूरचा आवाज जगात गौरवाने पोहोचविल्याचा अभिमान वाटला. आता २२ जानेवारीला देशगौरव, युगपुरुष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिराची पुजा करतील तेव्हा त्या मंदिराच्या प्रत्येक दाराचे लाकूड चंद्रपूरचे असेल, याचा प्रत्येक चंद्रपूरकराला अभिमान वाटेल. एवढेच नव्हे तर लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनात प्रवेश करताना देशातील प्रत्येक खासदाराला चंद्रपूरच्या लाकडाने तयार झालेल्या मंदिरातून जावे लागेल, ही बाब देखील तेवढीच अभिमानाची आहे, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

राक्षसीवृत्तीचा विरोध -

५ नोव्हेंबर २०२२ ला माझ्याकडे एक फाईल आली. त्यामध्ये अफजल खानाच्या कबरीचे उदात्तीकरण सुरू आहे आणि त्याठिकाणी अतिक्रमण झाले आहे, असे नमूद होते. दोन हजार पोलिसांच्या सुरक्षेत महाशिवप्रताप दिनाला हे अतिक्रमण आम्ही हटवले. हा धर्माचा विरोध नव्हता तर विचारांचा, राक्षसीवृत्तीचा विरोध होता. कारण भारताचा जवान अब्दूल हमीद, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांना आम्ही कधीही धर्माच्या नजरेतून बघितले नाही. आम्ही कबरीचे अतिक्रमण हटवले. आम्ही अफजलखानाचा विरोध करतो म्हणजे धर्माचा विरोध करतो असे नाही, असे ना. मुनगंटीवार यांनी म्हटले.

रत्नजडित छत्र, पालखी अन् पुतळा -

राज्याभिषेक होण्यापूर्वी प्रतापगडच्या भवानी मातेच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. तिथे त्यांनी एक रत्नजडीत छत्र भवानी मातेला चढवले. नंतर त्याची लूट झाली. पण पुन्हा चांदीचे छत्र बसविण्याचे भाग्य आपल्याला लाभले. महाराजांच्या राज्याभिषेकाची शोभायात्रा निघते तेव्हा पालखीही निघते. ही पालखी सुद्धा जीर्ण झाली होती. ती आपण चंद्रपूरच्या वतीने साठ किलो चांदीची पालखी दिली. पुढील दोनशे वर्षे राज्याभिषेकाची शोभायात्रा त्याच पालखीतूनच निघणार आहे याचा अभिमान आहे, असे ना. मुनगंटीवार म्हणाले. पोंभूर्णा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले आणि महाराणा प्रताप यांच्या वंशजांना आमंत्रित केले जाणार आहे, अशी माहितीही ना. मुनगंटीवार यांनी दिली. जाणता राजा या महानाट्याचा प्रयोगही चंद्रपुरात होणार असल्याचे ते म्हणाले.

क्रीडा स्पर्धा आणि कृषी प्रदर्शन -

२७ डिसेंबरला ५ वाजता विसापूरच्या स्टेडियमवर पहिल्यांदाच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत. २८ राज्य आणि ८ केंद्र शासित प्रदेशातील ३ हजार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम चंद्रपूरकरांनी करावे, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले. त्याचवेळी ३ ते ७ जानेवारी या कालावधीत चांदा क्लब ग्राउंडवर विदर्भातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन, पशू व मत्स्यसंवर्धन प्रदर्शन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चंद्रपूरमधील पुरातन मंदिरांसाठी निधी देण्याची घोषणा आपण अलीकडेच केल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूरमध्ये आकाराला येत असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉटनिकल गार्डन, मोरवा येथे तयार सुरू होत असलेला फ्लाईंग क्लब याचाही ना. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.





  Print






News - Chandrapur




Related Photos