ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात झाला विश्वविक्रम
- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली ७ हजार किलोपेक्षा अधिक खिचडी
- शिस्तबद्ध आयोजन व वाटप व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात आज सात हजार किलोपेक्षा जास्त तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला. महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंड येथे सुरू असलेल्या चांदा ॲग्रो २०२४ या भव्य कृषी प्रदर्शनात हा विक्रम नोंदविण्यात आला आहे.
विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार साजरे करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त ना. मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे विष्णू मनोहर यांनी चंद्रपूर येथे मिलेट खिचडी बनवून संपूर्ण जगाला मिलेटचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ४ जानेवारीला रात्री एक महाकाय कढई नागपूरहून चंद्रपूर येथे आणण्यात आली, जी क्रेन द्वारे मैदानात उतरविण्यात आली. याबाबत चंद्रपुरकरांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळाली. पहाटे ६ वाजता विक्रमी खिचडी बनविण्यास सुरुवात झाली.
६ हजार ७५० किलो खिचडी बनविण्याचा संकल्प विष्णू मनोहर यांनी केला होता. विविध विभागातील कर्मचारी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यावेळी स्वयंसेवक म्हणून उत्स्फूर्तपणे मदत करीत होते. ही खिचडी बनवण्याची पद्धत रेसिपी आणि मोठमोठ्या कढयांमधून टाकण्यात येणारे पदार्थ याबाबत सर्वच उपस्थितांमध्ये उत्साह दिसून आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ मिलेट वर्ष म्हणून घोषित केल्यानंतर विष्णू मनोहर यांनी मिलेटच्या प्रचार व प्रसारासाठी वर्षभर वेगवेगळ्या शहरात १२ मिलेट्सचे पदार्थ तयार करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार आतापर्यंत नागपूर, औरंगाबाद व नाशिक येथे त्यांनी मिलेटचे विविध पदार्थ तयार केले आहेत.
सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आयोजित चांदा ॲग्रो २०२४ मध्ये शेफ विष्णू मनोहर यांनी शुक्रवारी बाजरी हे मिलेट धान्य व सर्व भाज्यांचा वापर करून पूर्णान्न असलेली खिचडी तयार केली. त्यासाठी ते १० फूट व्यासाची, ५ फूट कढई, सुमारे ५०० किलो लाकूड वापरण्यात आले.
विष्णू मनोहर यांनी याआधी दिल्ली येथे ५ हजार किलोची ‘समरसता खिचडी’ तयार केली आहे. नागपुरातील महाल भागात खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावे या मागणीसाठी ५ हजार किलोची खिचडी तयार केली होती. वनवासी कल्याण आश्रमाच्या डिलिस्टींग कार्यक्रमासाठी त्यांनी १० हजार किलो मसालेभात व नागपुरातील खासदार सांस्कृतिक महोत्सवात विष्णू मनोहर यांनी श्री गजानन महाराजांना ६ हजार ५०० किलो खिचडीचा नैवेद्य अर्पण केला होता.
चांदा ॲग्रो २०२४ मध्ये करण्यात आलेला विक्रम महाराष्ट्रातील बळीराजाला समर्पित करण्याचा निर्धार यावेळी विष्णू मनोहर यांनी व्यक्त केला. पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ही संधी दिल्याबद्दल मनोहर यांनी त्यांचे आभारही मानले. राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्या हस्ते विष्णू मनोहर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प अधिकारी प्रीती हिरळकर, भाजपाचे महानगर अध्यक्ष राहुल पावडे, प्रकाश धारणे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्तश्री विपिन पालीवाल यांनी देखील ही खिचडी बनवताना विष्णू मनोहर यांच्या सोबत संवाद साधून उत्सुकतेने सर्व माहिती घेतली.
खिचडीचे शिस्तबद्ध वाटप -
७ हजा किलोपेक्षा जास्त झालेली या खिचडीचे वाटप कसे करावे हा प्रश्न सर्वांनाच उत्सुकतेपटी पडलेला होता. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांनी संपूर्ण यंत्रणा शिस्तबद्ध रीतीने कामाला लावली व खिचडी शाळांमध्ये तसेच शहरातील वस्त्यांमध्ये वाटण्याची व्यवस्था केली. कृषी प्रदर्शनाच्या स्थळी सुद्धा विविध स्टॉल लावून आलेल्या प्रत्येकाला खिचडी देण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी स्वयंसेवक म्हणून अथक परिश्रम घेतले. शहरातील ३५ हजार लोकांपर्यंत ही खिचडी पोहोचेल अशी व्यवस्था यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली होती. पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे ना. सुधीर मुनगंटीवार हे नागपूरला असल्याने त्यांनी फोनवरून विष्णू मनोहर यांना शुभेच्छा दिल्या आणि चंद्रपुरात हा विश्वविक्रम केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
News - Chandrapur