महत्वाच्या बातम्या

 चिमूर तालुक्यातील बालसंगोपन लाभार्थ्यांसाठी विशेष बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी १ ऑक्टोबर रोजी बालकल्याण समिती, चंद्रपूर तर्फे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत बालकांना महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदे व सुविधांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

बैठकीला बालकल्याण समितीच्या सदस्या डॉ. ज्योत्स्ना मोहितकर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सोनाली ताजणे आणि अजय कवाडे उपस्थित होते. यावेळी बालसंगोपन योजनेचा उद्देश, योजनेअंतर्गत मिळणारे लाभ, पात्रता तसेच योजनेची कार्यपद्धती याबाबत लाभार्थी बालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

बालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अनाथ प्रमाणपत्राचे महत्त्व व ते मिळविण्याची प्रक्रिया याबाबतही माहिती देण्यात आली. तसेच चाइल्ड हेल्पलाइन, महिला हेल्पलाइन यांसह बालकांना अडचणीच्या प्रसंगी उपलब्ध असलेल्या मदत यंत्रणांची माहिती देण्यात आली.

याशिवाय बालविवाह प्रतिबंध, पोक्सो कायदा आणि बालकामगार प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

बालकांच्या हक्कांचे संरक्षण, सुरक्षितता आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणांचा योग्य वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बालसंगोपन योजनेच्या लाभार्थी बालकांना शासनाच्या विविध योजनांची आणि त्यांच्या हक्कांची माहिती मिळावी, तसेच बालकांच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.





  Print






Related Photos