परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अहेरी येथे पालकमंत्र्यांनी घेतली तातडीची आढावा बैठक


- पूरग्रस्तांना तात्काळ मदत देण्याचा प्रशासनाला दिला आदेश 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी / अहेरी : 
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे क्षतीग्रस्त झालेल्या अहेरी शहर व आसपासच्या गावांची   पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.   पाहणीतून आलेल्या निष्कर्षांतून प्रशासकीय कामकाजाची कमतरता अधोरेखित झाल्यामुळे पालकमंत्र्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने अहेरी तालुकास्तरीय संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेची आढावा बैठक काल २० ऑगस्ट  (सोमवार) रोजी तहसील कार्यालयात आयोजित केली होती. 
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोदर नान्हे, तहसीलदार  प्रशांत घोरुडे, उपविभागीय अधिकारी (सिंचाई) हिंगोले, संवर्ग विकास अधिकारी मैसस्कर सह इतर प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते. काही अधिकारी मुसळधार पावसामुळे आलेल्या दळण-वळणाच्या अडचणींमुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाही.  पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या १०८२ मेंढ्यांच्या मेंढपाळांचे चराई पास, अतिवृष्टीमुळे घरांचे झालेले नुकसान, यावर उपाययोजना म्हणून शासनामार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध घरकुल योजना, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या,जनावरे व दैनंदिन वापराच्या वस्तूंची नुकसान भरपाई शासना मार्फत देणे. अशा अतिवृष्टीमुळे उत्पन्न झालेल्या विविध समस्यांवर उपाययोजना शासनाकडून त्वरित करण्यात याव्या यावर पालकमंत्र्यांनी बैठकीत भर दिला,व आढावा घेतला. 
अधिकृत - अनधिकृत घरांची यादी बनवून लवकरात लवकर त्याची प्रस्ताव तयार करा, राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांचा उद्देश पूर्ण झाला पाहिजे. काही कारणास्तव घरांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचू शकलेल्या नाहीत. आणि त्यांना पक्की घरे मिळालेली नाहीत. तेव्हा त्यांच्यापर्यंत योजना पोहचविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे. त्याचप्रमाणे कुठलाही पूरग्रस्त माणूस नाराज होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी ह्यावेळी दिले.
एका ठिकाणी बसून परिस्थिती आणि समस्या समजून घेता येत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष व्यक्तिगत भेटून नव्याने पंचनामा करण्यासंबंधीचे आदेश पालकमंत्र्यांनी तहसीलदार, पटवारी व इतर संबंधित महसूल अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे ज्यांच्या घरांना क्षती पोहचली आहे त्यांना शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध घरकुल योजनांद्वारे पक्की घरे देण्यासाठी उपाययोजना करा, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या मेंढ्या तसेच इतर दैनंदिन वापराच्या घरगुती वस्तूंच्या नुकसान भरपाई साठी शासनामार्फत त्वरित पंचनामा करून मदत देण्यात यावी असे आदेश पालकमंत्र्यांनी ह्या बैठकीत दिले. त्याचप्रमाणे पालकमंत्र्यांना प्रत्यक्ष निरीक्षणातून लक्षात आलेल्या इतर विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शासन दरबारातून काय उपाययोजना करण्यात येत आहेत? यावर विभागवार  चर्चा करून समस्यांचे निराकरण करण्यासंबंधीच्या सूचना  पालकमंत्री ना. आत्राम यांनी प्रशासनाला दिल्या.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-21


Related Photos