बल्लारपुरात छठ पूजेचा भक्तिमय उत्साह : आज अस्ताला जाणाऱ्या सूर्याला अर्घ्य अर्पण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : उत्तर भारतीय समाजाच्या श्रद्धेचे प्रतीक असलेला चार दिवसीय छठ पूजा महोत्सव बल्लारपूर येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. नहाय-खाय आणि खरना पूजन विधी पार पडल्यानंतर रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अस्ताला जाणाऱ्या सूर्यदेवाला पहिले अर्घ्य अर्पण केले जाणार आहे. तर सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन या पवित्र व्रताची सांगता होणार आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी येथील वेकोलि कॉलनी छठ घाट तसेच राजुरा मार्गावरील वर्धा नदीच्या घाटावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. रविवारी सूर्यास्ताच्या वेळी महिला व्रतींसह नागरिक मोठ्या संख्येने घाटावर एकत्र येऊन सूर्यदेवाला जल अर्पण करणार असून फळे, फुले आणि पारंपरिक प्रसादाचा नैवेद्य दाखवून कुटुंबाच्या सुख-समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना करणार आहेत.
छठ पूजा हा अत्यंत कठीण आणि पवित्र सण मानला जातो. या व्रतामध्ये व्रती सलग ३६ तास निर्जला उपवास करतात. सूर्यदेव आणि छठी मैयाची आराधना करण्यासाठी विविध फळे, फुले, कंदमुळे, तुपाचे दिवे, मातीचे दीप तसेच बांबूच्या सूपाचा वापर केला जातो. शुद्ध गव्हाचे पीठ आणि गुळापासून तयार करण्यात येणारा पारंपरिक ठेकुआ हा या पूजेतील विशेष प्रसाद असतो. या संपूर्ण पूजाविधीत कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण श्रद्धेने सहभागी होऊन एकमेकांना सहकार्य करतात.
छठ पूजेची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. पौराणिक कथांनुसार, त्रेतायुगात माता सीता, तर द्वापारयुगात द्रौपदी आणि सूर्यपुत्र कर्ण यांनी सूर्योपासना केल्याचे उल्लेख आढळतात. ऋग्वेदातही सूर्याला प्रत्यक्ष दर्शन देणारी देवता मानून त्याची उपासना करण्यात आली आहे. याच प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन छठ पूजेच्या माध्यमातून आजही घडत आहे. बल्लारपूर परिसरात या महोत्सवामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, घाटांवर होणाऱ्या सामूहिक सूर्योपासनेची भाविकांना उत्सुकता लागली आहे. श्रद्धा, संयम, निसर्गपूजा आणि कौटुंबिक एकतेचा संदेश देणारा हा छठ पूजा महोत्सव उत्तर भारतीय समाजासाठी विशेष महत्त्वाचा ठरत आहे.




Petrol Price




