आरोग्याच्या प्रश्नांना साहित्याची जोड : बल्लारपुरात पहिले जिल्हा आरोग्य साहित्य संमेलन


- ९ सप्टेंबरला आयोजन, डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य, व्यसनमुक्ती आणि ग्रामविकासावर मंथन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : आरोग्य हा केवळ उपचाराचा विषय न राहता तो सामाजिक जाणीव, साहित्य आणि लोकसहभागाशी जोडला जावा, या उद्देशाने बल्लारपुरात राज्यातील अभिनव प्रयोग म्हणून पहिले जिल्हा आरोग्य साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. पंचायत समिती आणि फिनिक्स साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत ९ सप्टेंबर रोजी गोंडराजे बल्लाळशहा नाट्यगृहात हे संमेलन होणार आहे. प्रसिद्ध समाजसेवक व साहित्यिक डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनात आरोग्यविषयक विविध प्रश्नांवर साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मंथन केले जाणार आहे.
आरोग्य स्वराज्यावर डॉ. बंग यांचे भाष्य -
संमेलनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या समारोपीय सत्रात डॉ. अभय बंग ‘आरोग्य स्वराज्य’ या संकल्पनेवर विशेष भाष्य करणार आहेत. गावपातळीवर आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्याबरोबरच नागरिकांनी स्वतःच्या आणि समाजाच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारावी, या दृष्टिकोनातून संमेलनातील चर्चांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून गटविकास अधिकारी धनंजय साळवे स्वागताध्यक्ष आहेत. नगराध्यक्षा डॉ. अल्का वाढई, तहसीलदार रेणुका कोकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा साळवे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
ग्रंथदिंडीने होणार प्रारंभ -
संमेलनाची सुरुवात सकाळी ग्रंथदिंडीने होणार आहे. त्यानंतर आरोग्यातून ग्रामनिर्माण : नागरिक, साहित्यिकांची जबाबदारी या विषयावर परिसंवाद होईल. डॉ. अर्जुन पावरा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात आदर्श गाव राजगडचे चंदू पाटील मारकवार आणि डॉ. प्रविण येरमे सहभागी होणार आहेत. दुपारी १.३० वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन होणार असून कवयित्री अर्जुनमवानो शेख अध्यक्षस्थानी राहणार आहेत. कवी प्रदीप देशमुख आणि सुधाकर कन्नाके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
व्यसनमुक्तीवरही होणार मंथन -
दुपारी ३ वाजता ‘लढाई व्यसनमुक्तीची : घरापासून समाजापर्यंत’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अॅड पारोमिता गोस्वामी अध्यक्षस्थानी राहणार असून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विवेक बांबोडे आणि सोमनाथ व्यसनमुक्ती प्रकल्पाच्या डॉ. हेमलता पानगंटीवार सहभागी होणार आहेत. व्यसनाच्या वाढत्या समस्येवर कुटुंब, समाज आणि प्रशासनाची भूमिका यावेळी चर्चिली जाणार आहे.
समारोपात ठराव मांडणार -
सायंकाळी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय सत्र होईल. सामाजिक कार्यकर्ते बंडू धोत्रे, लेखक राजेश मडावी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिव्याख्याता डॉ. शारदा येरेमे आणि स्वागताध्यक्ष धनंजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. फिनिक्स साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे सचिव विजय वाटेकर यावेळी संमेलनात ठराव मांडणार आहेत. आरोग्य आणि साहित्याच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाला चालना देण्याचा हा उपक्रम असून, साहित्यिक, आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी केले आहे.




Petrol Price




