संघटीत होऊनच दारूमुक्ती साध्य होईल : डॉ. राणी बंग


- सिरोंचा येथे व्यसनमुक्ती संमेलन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा :
गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी आपण खूप कष्टाने मिळविली आहे. त्यासाठी मोठा लढा उभारावा लागला. आजही महिलांना दारूबंदी टिकविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. संमेलनासाठी बहुसंख्येने उपस्थित असलेल्या महिला याची साक्ष देतात. पण आपले ध्येय्य हे दारूमुक्ती आहे. आणि त्यासाठी महिला व पुरुषांनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. माझा नवरा दारू पीत नाही त्यामुळे मी कशाला यात सहभागी होऊ असे म्हणणे बरोबर नाही. कारण समोरचे घर जळत आहे म्हणून आपण शांत बसून राहिलो तर ती आग हळूहळू पसरत आपल्यालाही कवेत घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे संघटीत होऊन दारू खर्राबंदीसाठी लढण्याची गरज आज निर्माण झाली आहे. एक अधिक एक दोन होतात तसेच अकरा देखील होतात. तुमची ताकद तुम्हालाच ओळखावी लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांनी केले.
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या सिरोंचा येथे मुक्तिपथ द्वारे आयोजित व्यसनमुक्ती संमेलनात मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. तेलुगू भाषित असलेल्या येथील लोकांशी डॉ. राणी बंग यांनी तेलुगूतच साधलेला संवाद नवी प्रेरणा देऊन गेला. पारा ४५ ते ४७ अंशाच्या मध्ये फिरत असतानाही तालुक्यापासून दूरवर असलेल्या ७२ गावातील मुक्तिपथ गाव संघटनेचे ३२७ महिला व पुरुष कार्यकर्ते यावेळी हजार होते. मोठ्या संख्येने महिला संमेलनात सहभागी झाल्या होत्या. मुक्तिपथ चे संचालक डॉ. मयूर गुप्ता, पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, सहायक पोलीस निरीक्षक पतंगराव पाटील, सुनंदा खोरगडे यांचीही यावेळी उपस्थिती होती.
डॉ. बंग म्हणाल्या, शासनाने १९९३ मध्ये जिल्ह्यात दारूबंदी लागू करून गावातील दारू बंद करण्याचा अधिकार ग्रामस्थांना दिला आहे. त्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची आपल्याला आवश्यकता नाही. लोकांनी संघटीत होऊन दारूविक्री बंद करावी यासाठी मुक्तिपथ प्रकल्प सुरू करण्यात आला. महिला संघटीत होऊन मोठ्या प्रमाणात अहिंसक कृती द्वारे गावातील दारूविक्रेत्यांच्या विरोधात हिमतीने उभ्या आहेत. पुरुषांनीही त्यांना साथ देण्याचे आवाहन डॉ. बंग यांनी उपस्थितांना केले.
 खर्रा आणि दारूचे दुष्परिणाम समजावताना डॉ. बंग म्हणाल्या, एक डॉक्टर या नात्याने दारू आणि खर्रा सेवनामुळे होणारे आजार आणि त्रास मी खूप जवळून पाहते. खर्रा सेवनामुळे जिल्ह्यात कॅन्सर चे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे या पदार्थांचे सेवन टाळणे खूप आवश्यक आहे. पुरुषांच्या दारू पिण्याचा त्रास घरच्या स्त्री ला व मुलांना सहन करावा लागतो. अनेक सामाजिक व आर्थिक प्रश्न यातून निर्माण होतात. त्यामुळे दारू पिणे टाळतानाच व्यसन हा आजार आहे. तो उपचाराने बरा होतो हे समजून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
अनेक महिलांनी यावेळी गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी दिलेला लढा सर्वांसमोर मांडला. पोलिसांनी दारूविक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली. पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी महिलांना आश्वस्थ केले. दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी पोलीस सतत प्रयत्नशील आहेत. महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. खर्रा सेवनाने होणारे दुष्परिणाम सांगणारा यमराजाचा फास हा चित्रपट दाखविण्यात आला. भावी पिढी तंबाखूजण्य पदार्थांच्या आहारी जाऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले असरअली येथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक खुर्शीद शेख यांच्या ‘तंबाकूमुक्त पाठशाला’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. राणी बंग यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. संचालन मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर यांनी केले. सिरोंचा तालुका मुक्तिपथ संघटक सुनीता भगत, उपसंघटक महेंद्र सदनपू आणि प्रेरक संतोष चंदावार यांनी संपूर्ण संमेलनाचे नियोजन केले होते. मुक्तिपथ चमू ने यशस्वितेसाठी सहकार्य केले.

दारूविक्री हा दाखलपात्र गुन्हाच असावा

दारूविक्री करताना कुणी आढळल्यास त्याला मुद्देमालासह पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी गाव संघटनेच्या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागते. पण दारूविक्री हा अदखलपात्र गुन्हा असल्याने काही तासातच विक्रेता पैसे देऊन जामीन घेऊन घरी येतो. त्यामुळे दारूविक्री हा दखलपात्र गुन्हा असावा, असे मी शासनाला वारंवार सांगत आली आहे. दखलपात्र गुन्हा झाल्यास विक्रेत्यांना जमीन मिळणार नाही. त्यांच्यावर जरब बसेल. ग्रामसभेने आता ही ताकद आपल्याला दिली आहे. गावागावात ग्रामसभांमध्ये दारूविक्री हा दखलपात्र गुन्हा असावा असा ठराव घेऊन सरकारला सादर करण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे डॉ. बंग यांनी सांगितले. 

दारूवरती हल्लाबोल


संमेलनात ३०० च्या आसपास महिला सहभागी झाल्या होत्या. गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी या महिला प्रयत्नशील आहेत. अनेकदा विक्रेते शिवीगाळ करतात. जीवे मारण्याची धमकी देतात. पण त्यांच्या धमक्यांना भिक न घालता महिला लढत आहेत. या लढ्यात आलेले अनेक अनुभव महिलांनी यावेळी मांडले. दारूविक्रेत्यांना अजिबात भीत नसल्याचे त्या म्हणाल्या. त्यांचा हा जोश पाहून डॉ. राणी बंग यांनी दारूवरती हल्लाबोल हा नारा दिला. शेकडो महिलांनी दारूवरती हल्लाबोल चढवत परिसर दणाणून सोडला. 

प्रत्येक सोमवारी व्यसन उपचार क्लिनिक

व्यसन हा आजार आहे. त्यावर उपचार शक्य असल्याने दारू ची सवय सोडल्याची इच्छा असलेल्या व्यासनींवर उपचारासाठी सिरोंचा येथील मुक्तिपथ तालुका कार्यालयात १७ जून पासून व्यसन उपचार क्लिनिक सुरू होत आहे. आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी हे क्लिनिक राहणार असून व्यसनींवर उपचार होणार आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-12


Related Photos