कोठारी पुलाच्या दुरवस्थेविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचा रास्ता रोकोचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गावालगत नाल्यावर असलेला पूल अत्यंत जीर्ण झाला असून, या पुलावरून दररोज हजारो नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून संरक्षक कठडे तुटले आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, शेतकरी तसेच दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुलाची तातडीने दुरुस्ती किंवा नवीन पुलाचे बांधकाम करण्याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडीने केली आहे.
या पुलावरून लॉयार्ड मेटल कंपनीच्या कच्च्या मालाची वाहतूक करणारे अवजड ट्रक दररोज मोठ्या संख्येने धावत असल्याने पुलावरील धोका अधिक वाढला असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असतानाही नवीन पुलाचे बांधकाम करण्याऐवजी केवळ खड्ड्यांवर डांबर टाकून डागडुजी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुलाचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करावे, पुलावरून होणारी अवजड वाहतूक बंद करावी, नवीन पुलाचे काम तातडीने सुरू करावे, लॉयार्ड मेटलच्या जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, तसेच जड वाहनांच्या वाहतुकीवर वेळेचे निर्बंध घालून २४ तास वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.
या मागण्यांसंदर्भात तहसीलदार, तहसील कार्यालय बल्लारपूर तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग बल्लारपूर यांना निवेदन देण्यात आले असून, ते सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. येत्या १५ दिवसांत मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास कोठारी पुलावर रास्ता रोको आंदोलन तसेच तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष नम्रता साव, युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष अभिलाष चुनारकर, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष रेखा पागडे, महासचिव गौतम रामटेके, शहर संघटक राकेश पेटकर, दुरेश तेलंग, प्रजय देवगडे, रोहित जोशी, अनुमशन, अरुण घ्यावान, संदीप ढोके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




Petrol Price




