लोकबिरादरी प्रकल्पाचा ४५ वा वर्धापन दिन सोहळा थाटात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मनिष येमुलवार / भामरागड  : 
२३ डिसेंबर १९७३ ला श्रद्धेय,कर्मयोगी बाबा आमटे यांनी तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्याच्या पूर्व टोकाला, घनदाट अरण्यात, हेमलकसा येथे 'लोकबिरादरी प्रकल्पाची' मुहूर्तमेढ रोवली. बाबांचा वसा पुढे चालवित जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. सौ.मंदाकिनी आमटे या दांम्पत्यांनी या ठिकाणाला कर्मभूमी मानली. त्यांच्या अविरत व अविश्रांत सेवेला ४५ वर्षे पूर्ण झाले. त्यामुळे लोकबिरादरी प्रकल्पाचा ४५ वा वर्धापनदिन आज २३ डिसेंबर रोजी  उत्साहात साजरा करण्यात आला.
 समाजसेवेच्या या महाकेंद्रामुळे वंचित,शोषित आदिवासींना जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली. अनेक रुग्णांना जीवदान मिळाले. अनेकांना डॉक्टर,इंजिनिअर वकील सहित शासकिय सेवेत विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. काहींना राजकिय क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त झाले. व्यावसायिक निर्माण झाले.एवढेच नाही तर मानवाप्रमाणे मुक्या जंगली जखमी व आजारी प्राण्यांनासुद्धा हक्काचे घर मिळावे यासाठी प्राणी अनाथालय सुरु झाले. एकंदरीत वंचित पशु व मानवांच्या जीवनाला सकारात्मक कलाटणी मिळाली, ती या ' लोकबिरादरी प्रकल्पा'मुळे ! त्यामुळे वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम,खेळ व शैक्षणिक गंमत जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. २३ ते २६ डिसेंबरपर्यंत लोकबिरादरी आश्रम शाळेचे स्नेहसंम्मेलन होणार आहे.
 लोकबिरादरी प्रकल्पाच्या वर्धापन दिन प्रसंगी आदिवासी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या गोटुलमध्ये कर्मयोगी, श्रद्धेय बाबा आमटे व स्व.साधनाताई आमटे यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून व द्विप प्रज्ज्वलित करुन वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान जालनाचे प्रमुख अजय किंगरे, चंद्रपूरचे गणेश झाडे,  मीना किंगरे, भामरागड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा संगिता गाडगे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे,  आरती नानकर, मनोहर येम्पलवार, प्रा.डॉ. विलास तळवेकर, मुख्याध्यापक शरिफ शेख इत्यादी  मान्यवर उपस्थित होते. यावेळी  लोकबिरादरी प्रकल्प व आमटे कुटुंबाचा त्यासाठी केलेला त्याग यावर मान्यवरांनी विचार व्यक्त केले. 
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. तळवेकर यांनी केले. संचालन प्रा.गिरीष कुलकर्णी यांनी तर उपस्थितांचे आभार सुरेश गुट्टेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी प्रा.खुशाल पवार, जमीर शेख, प्रा.चंद्रीकापूरे, झोडे  ,अशोक चापले, सौ.तळवेकर, समर्थ  , तुषार कापगते, विजया किरमिरवार, भक्ती चौधरी, कुडयेमी  , कोंडुरे  , प्रविण राऊत इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-23


Related Photos