महत्वाच्या बातम्या

 श्री गणेशा आरोग्याचा अभियानातून आरोग्य तपासणीला प्राधान्य पुलगाव, आर्वी येथे असंसर्गजन्य आजार तपासणी शिबिरे


  1. - ३० वर्षांवरील नागरिकांना नियमित तपासणीचे आवाहन

  2. विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
    प्रतिनिधी / वर्धा : बदलती जीवनशैली, वाढता ताण आणि धावपळीची दिनचर्या यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. या आजारांचे वेळीच निदान होऊन प्रतिबंध व उपचाराची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी श्री गणेशा आरोग्याचा अभियानांतर्गत जिल्ह्यात आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत जनजागृतीला चालना मिळत आहे.

  3. या उपक्रमांतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, पुलगाव येथे असंसर्गजन्य आजार व सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करून रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली. तसेच वॉर्डातील ३० वर्षांवरील नागरिकांना असंसर्गजन्य आजारांची (एनसीडी) तपासणी करून घेण्यासाठी आरोग्य सेवकांनी प्रोत्साहित केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकिता डाहाके यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व तसेच आजारांचे वेळीच निदान झाल्यास उपचार करणे सुलभ होते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

  4. एचबीटी आपला दवाखाना, आर्वी यांच्यावतीने अष्टविनायक गणेश मंडळ, आर्वी येथे असंसर्गजन्य आजार तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात उपस्थित नागरिकांचा रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली. मधुमेह व उच्च रक्तदाब यांसारखे आजार टाळण्यासाठी नियमित तपासणी, योग्य आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली.

  5. श्री गणेशा आरोग्याचा माध्यमातून शासकीय आरोग्य सेवा नागरिकांच्या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्राधान्य देण्यात येत आहे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी करून आवश्यक उपचार घेणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिरांचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबातील 30 वर्षांवरील सदस्यांचीही नियमित एनसीडी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले.





  Print






Related Photos