महत्वाच्या बातम्या

 देऊळभट्टी गाव तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प


- मुक्तिपथ अभियानाच्या पुढाकारातून जिल्हा परिषद शाळेची अभिनव पहल; शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : तंबाखू आणि इतर व्यसनांच्या वाढत्या प्रभावामुळे व्यक्तीच्या आरोग्यासोबतच संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीवरही विपरीत परिणाम होत आहे. व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंबांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन कोरची तालुक्यातील देऊळभट्टी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने संपूर्ण गाव तंबाखूमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मुक्तिपथ अभियानाच्या माध्यमातून शाळेत तंबाखूमुक्त शाळा हा प्रायोगिक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला व्यापक स्वरूप देत केवळ शाळाच नव्हे, तर संपूर्ण गाव आणि गावातील प्रत्येक कुटुंब तंबाखूमुक्त करण्याचा निर्धार शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि पालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कुटुंबापर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविणे आणि गावात तंबाखूविरोधी वातावरण निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या अनुषंगाने बुधवारी शाळा व्यवस्थापन समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गावातील तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, व्यसनांमुळे कुटुंबावर होणारे आरोग्यविषयक आणि आर्थिक परिणाम तसेच व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी करावयाच्या प्रयत्नांवर चर्चा करण्यात आली. तंबाखूचे सेवन टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, पालकांनी मुलांसमोर व्यसनमुक्त जीवनशैलीचा आदर्श ठेवणे आणि विद्यार्थ्यांनीही जनजागृतीमध्ये सहभागी होणे, यावर विशेष भर देण्यात आला.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंबाखू व व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगण्यासोबतच त्यांच्या कुटुंबीयांमध्येही जनजागृती केली जाणार आहे. शाळा, पालक आणि ग्रामस्थ यांच्या सामूहिक सहभागातून गावात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

बैठकीला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जागेश्वर करचो, मुख्याध्यापक विनोद कोरेती, शिक्षक चवार, कोडपे, रामटेके, काळे तसेच मुक्तिपथ अभियानाचे युवनाथ मेश्राम, गायत्री करसी, कमलेश्वरी फुलारे, प्रीती फुलारे आणि मेघनाथ दुधकुवर उपस्थित होते. शाळेच्या माध्यमातून गावात व्यसनमुक्तीची चळवळ उभी करण्याचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून, देऊळभट्टी गाव तंबाखूमुक्त करण्याच्या संकल्पाला ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग लाभणे अपेक्षित आहे.





  Print






Related Photos