बोगस ठरावाद्वारे प्रवेशद्वाराचे काम सुरू : तत्काळ थांबविण्याची ग्रामस्थांची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : तालुक्यातील ग्रामपंचायत विचोडा (रे.) अंतर्गत विचोडा (बु.) येथे कथित बोगस ठरावाच्या आधारे सुरू असलेले मुख्य प्रवेशद्वाराचे बांधकाम तत्काळ थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास प्रवेशद्वाराच्या उद्घाटनाला विरोध करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिला.
विचोडा (बु.) येथील मुख्य प्रवेशाच्या ठिकाणी प्रवेशद्वार व सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयांचा शासकीय निधी मंजूर करण्यात आला आहे. गावात अनेक वर्षांपासून विविध जाती-धर्माचे नागरिक सलोख्याने राहत असताना काही घटकांनी संगनमत करून विशिष्ट जाती-धर्माचे प्रतीक असलेले नाव प्रवेशद्वाराला देण्याचा ठराव केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कथित ठरावाच्या आधारे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधकाम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
सदर प्रवेशद्वाराचे बांधकाम पंचशील बौद्ध विहारालगत होत असल्याने धार्मिक व सामाजिक भावना दुखावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. विनोद खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत केला. गावाच्या सर्वसमावेशक ओळखीला अधोरेखित करणारे ‘विचोडा (बु.) आपले सहर्ष स्वागत करीत आहे’ असे नाव देणे अधिक योग्य ठरले असते, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
कथित बोगस ठरावाच्या माध्यमातून गावातील सामाजिक सलोखा बिघडण्याची तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. यासंदर्भात महसूल व पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्याचा दावा करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
प्रवेशद्वाराचे काम तातडीने थांबवून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, तसेच नियमबाह्य ठराव झाला असल्यास त्याबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास पुढील काळात आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला.
यावेळी गंभीरदास देवगडे, राकेश रामटेके, वैशाली साव, कोमल रामटेके, शांताराम साव, प्रज्वल सगदेव, नरेंद्र देवगडे, लखन ढोके, संजय बोबडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.




Petrol Price




