साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : आयआयटी मुंबई येथील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध सीबीआय चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील गैरप्रकाराचे आरोप, त्यांच्या चारित्र्याबाबत प्रसारित झालेली माहिती तसेच कुटुंबीयांनी केलेले जातीय भेदभाव, अपमान आणि मानसिक छळाचे आरोप याबाबत स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे. या सर्व बाबींची सत्यता तपासून वस्तुस्थिती समोर आणणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
शैक्षणिक संस्थांमध्ये जातीय भेदभावाच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, कोणत्याही विद्यार्थ्याला न्यायापासून वंचित ठेवले जाऊ नये, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली. साहिल वाकोडे यांच्या मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशी करण्याबरोबरच परीक्षेतील गैरप्रकाराच्या आरोपांची पार्श्वभूमी, उपलब्ध पुरावे आणि प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
कुटुंबीयांनी केलेल्या जातीय भेदभाव, अपमान आणि मानसिक छळाच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करावी, तसेच चुकीची किंवा खोटी माहिती प्रसारित झाल्याचे चौकशीत आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. सूर्यकुमार डुल्ला यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद असल्यास त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यासोबतच आयआयटी मुंबईसह सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी प्राध्यापकांची आरक्षणानुसार प्रलंबित भरती पूर्ण करावी, आयआयटी कॅम्पसमध्ये जातीय भेदभावाच्या तक्रारींसाठी स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा उभारावी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना संविधानिक मूल्ये, समानता आणि विद्यार्थी अधिकारांबाबत प्रशिक्षण द्यावे, तसेच जातीय भेदभावाच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी स्पष्ट कार्यपद्धती (एसओपी) तयार करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी आणि कोणालाही संस्थात्मक संरक्षण मिळू नये, अशी मागणीही वंचित बहुजन युवा आघाडीने केली. यावेळी साहिल वाकोडे यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. निवेदन देताना वंचित बहुजन युवा आघाडीचे अनिकेत गोडबोले, सिद्धांत पुणेकर, हर्षवर्धन कोठारकर, अभिलाष चुनारकर, नकुल कांबळे, प्रतीक वाघमारे, सुदेश शिंगाडे, प्रजय देवगडे, कुणाल उराडे, आनंद वासनिक, अजय उराडे, अविनाश वाळके, श्रुती दुर्गे, सिद्धार्थ भैसारे, राकेश पेटकर, राहुल गौरकार, डॉ. प्रज्ञाशील सहारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविता गौरकार, महानगराध्यक्ष तनुजाताई रायपुरे, मोनाली पाटील, अनिता खरतड, पुष्पा कोटांगले, दिलीप मेश्राम यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




