आयपीएस कुमार सुशांत यांच्या धडक कारवाईत दोन रेती हायवा जप्त : ५१ लाखांचा मुद्देमाल ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन हायवांवर सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांनी पहाटे धडक कारवाई केली. जुनोना परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत दोन हायवा व त्यातील रेती असा एकूण ५१ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मंगळवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत हे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या पथकासह बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोंभुर्णा मार्गाने येणाऱ्या दोन हायवांवर संशय आल्याने जुनोना परिसरात त्यांची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान एमएच ३४ सीक्यू ९९९६ आणि एमएच ३६ एए ८७०० क्रमांकाच्या दोन्ही हायवांमध्ये रेती भरलेली आढळून आली. सदर रेतीची वाहतूक अवैध पद्धतीने केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कुमार सुशांत यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दोन्ही हायवा ताब्यात घेतले. या कारवाईत हायवा चालक सुमित संतोष टेंभुर्णे (४२), रा. अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर आणि नितीन मनराज कातकर (३९), रा. घोडपेट सायवन, ता. भद्रावती यांना ताब्यात घेण्यात आले. वाहनांसह रेती असा एकूण ५१ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहाटेच्या वेळी पोंभुर्णा मार्गावर सुरू असलेली अवैध रेती वाहतूक पोलिसांच्या कारवाईच्या कचाट्यात सापडल्याने रेती तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जप्त केलेल्या रेतीचा स्रोत, वाहतुकीचा मार्ग आणि या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींचा तपास सुरू आहे.




Petrol Price




