कोच्ची - मोहदा मार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ युवकाला अडवून लाखो रुपये लूटले


- सोन्याची चेन, अंगठी, ब्रेसलेट, घड्याळ व रोख रकमेसह १ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास
विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : घाटन्जी तालुक्यातील कोच्ची - मोहदा मार्गावरील शेतशिवारात तिघा अज्ञात चोरट्यांनी एका २५ वर्षीय युवकाला रस्त्यात अडवून मारहाण केली आणि त्याच्याकडील १ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, कोच्ची-मोहदा मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आर्यन तारामली राजवानी २५ वर्ष रा. मोहदा (ह. मु. अमेरिका) हा २ सप्टेंबर रोजी दुचाकीने कोच्ची येथे धरण पाहण्यासाठी गेला होता. दुपारी ३ वाजताच्या दरम्यान धरण पाहून तो मोहदा येथे परतत असतान्ना कोच्ची-मोहदा मार्गावरील शेतशिवारात तिघा अज्ञात चोरट्यांनी त्याला अडवले.
त्यानंतर मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन, सोन्याची अंगठी, ब्रेसलेट, घड्याळ आणि एक हजार रुपये रोख असा एकूण १ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. लूट केल्यानंतर तिघेही चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. आर्यन हा अमेरिकेत (AMERICA) वास्तव्यास असून काही दिवसांपूर्वी भारतात फिरण्यासाठी आपल्या आजोबांकडे आला होता. मात्र, भारत भेटीदरम्यान त्याला भरदिवसा लुटीला सामोरे जावे लागल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आर्यनच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन राठोड, पोलीस उपनिरीक्षक विनाश जाधव, ठाणेदारचे रायटर दिनेश जाधव, प्रवीण तालकोपुलवार, अरविंद चेमेट व प्रलय खोबरकर आदी पुढील तपास करीत आहे.




Petrol Price




