‘त्या’ चार मतदान केंद्रांवर झाले ४५.०५ टक्के मतदान, लोकसभा क्षेत्रात एकूण ७१.९८ टक्के मतदानाची नोंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
11 एप्रिल रोजी गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी मतदान घेण्यात आले. यावेळी एटापल्ली तालुक्यात नक्षली कारवायांमुळे मतदान पथके न पोहचू शकल्याने चार मतदान केंद्रांवर मतदान झाले नव्हते. यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आज 15 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले असून या चारही मतदान केंद्रावर 45.05 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात एकूण 71.98 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदानासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकांना आणण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. 
110 वटेली, 112 गर्देवाडा, 113 गर्देवाडा आणि 114 गर्देवाडा या चार मतदान केंद्रावर 11 एप्रिल रोजी मतदान झाले नाही. त्यामुळे आज गट्टा येथील जि.प. शाळेत चारही मतदान केंद्रांवरील मतदारांसाठी मतदान घेण्यात आले. वटेली येथील एकूण 933 मतदारांपैकी 494 मतदारांनी मतदान केले. 112 गर्देवाडा या मतदान केंद्रावरी 645 मतदारांपैकी केवळ 280 मतदारांनी मतदान केले. गर्देवाडा (पुस्कोटी) मतदान केंद्रावरील 437 मतदारांपैकी 188 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर गर्देवाडा (वांगेतुरी) मतदान केंद्रावरील 671 मतदारांपैकी 248 मतदारांनी मतदान केले आहे. चारही मतदान केंद्रावरील 2 हजार 686 मतदारांपैकी 789 पुरूष आणि 421 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदानाची टक्केवारी 45.05 टक्के आहे. 
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रातील आमगाव विधानसभा क्षेत्रात 68.68 टक्के, आरमोरी विधानसभा क्षेत्रात 73.80 टक्के, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात 72.88 टक्के, अहेरी विधानसभा क्षेत्रात 67.03 टक्के, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात 75.26 टक्के आणि चिमूर विधानसभा क्षेत्रात 71.98 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-15


Related Photos