महत्वाच्या बातम्या

 शेतमाल बाजारात येताच भाव घसरले, जागतिक बाजारपेठेचा परिणाम


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कपाशीच्या उत्पादनात घट झाल्यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु जागतिक बाजारपेठेत सोयाबीन आणि कापसाच्या भावामध्ये घसरण झाल्याने आपल्याकडेही शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येताच गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी भावामध्ये विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर असून पुढेही फारसे भाव वाढण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे.
गेल्यावर्षी जागतिक बाजारपेठेत सोयाबीनला १४ डॉलर प्रति बुसेल भाव होते. गेल्यावर्षी सुरुवातीला आपल्या देशातून ढेपेची निर्यात करण्यात आली. आणि त्यानंतर सोयाबीनचे पीक बुडाले अशा बातम्या पसरल्याने ढेपीची किंमत आपसूकच वाढली. दरम्यान सोयाबीनचा आयात कर शून्य केला आणि जीएम ढेप आयात करण्याची परवानगी दिली. त्यामुळे आपल्याकडे सोयाबीनचे भाव वाढले.
रुपयाच्या अवमूल्यनामुळे मिळतोय भाव 
जागतिक बाजारपेठेमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयांचे अवमूल्यन झाल्यानेच सध्या आपल्याकडे हा वाढीव भाव मिळत आहे, हे नाकारता येत नाही. दुसरीकडे शासन हे अवमूल्यन कमी करण्यासाठी बाजारात डॉलर विक्रीकरिता काढत आहे. परंतु हे अवमूल्यन शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरत आहे. शासनाने अवमूल्यन थांबवून हमीभावापेक्षा कमी भावात कोणत्याही शेतमालाची खरेदी होणार नाही, अशी हमी देण्याची गरज व्यक्त होत आहे.
कापसाचे भावही गडगडले  
यंदाही जागतिक बाजारपेठेत सोयाबीनचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी असल्याने आपल्याकडे ५ हजार २०० ते ५ हजार ३०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. हीच परिस्थिती कापसाच्या बाबतीतही आहे. मागील वर्षी जागतिक बाजारपेठेत १ डॉलर ७० सेंट प्रति पाउंड रुईचा भाव होता. त्यामुळे कापसाचे भावही आपल्याकडे चांगलेच वधारले होते. यावर्षी जागतिक बाजारपेठेत हेच भाव ९५ सेंटवर आल्याने आपल्याकडे कापसाचे भाव गडगडले.





  Print






News - Wardha




Related Photos