भामरागडच्या पुरामुळे त्यांना वडीलांचे अंत्यदर्शनही घेता आले नाही!


- दुःख बाजूला सारून करीत होते पुरग्रस्तांना मदत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यात पुरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. यामुळे नागरीकांना पुराबाहेर काढण्यासाठी तसेच मदत करण्यात पोलिस दल कसरत करीत होता. यामध्ये एक पोलिस शिपाई होते अंकुश श्रीकृष्णा शिरसाट.  त्यांच्या वडीलांचे ७ सप्टेंबर रोजी निधन झाले. मात्र पुरामुळे त्यांना वडीलांचे अंत्यदर्शनही घेता आले नाही. हे दुःख बाजूला सारून अंकुश शिरसाट पुरात अडकलेल्यांना बाहेर काढत होते.
अतिशय दुर्दैवी वेळ अंकुश शिरसाट यांच्यावर आली. मुळ अमरावती येथील रहिवासी असलेले पोलिस शिपाई अंकुश शिरसाट हे भामरागड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. ७ सप्टेंबर पासून भामरागडला पुराने वेढले होते. यावेळी ते कर्तव्यावर असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाल्याची वार्ता कळली. परंतु भामरागड येथून बाहेर पडणे शक्य नव्हते. वरीष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब माहिती होताच त्यांनी पोलिस मुख्यालयास संपर्क साधून हेलिकाॅप्टरची मागणी केली. पोलिस विभागाने हेलिकाॅप्टर पाठविलेसुध्दा परंतु जिकडे तिकडे पाणी असल्याने व पाउस सुरू असल्याने हेलिकाॅप्टर उतरविता आले नाही. अखेर ९ सप्टेंबर रोजी अधिकाऱ्यांनी पुन्हा हेलिकाॅप्टर पाठवून शिरसाट यांना भामरागड बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत वडीलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. सध्या ते स्वागावी आहेत. मात्र वर्दीतला माणूस दुःख बाजूला सारून इतरांना संकटातून बाहेर काढत राहिल्याने पोलिस विभागाप्रती नागरीकांनी अभिमान व्यक्त केला आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-10


Related Photos