महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्हयातील २ लाख ८० हजार बालकांची होणार आरोग्य तपासणी


- जागरुक पालक, सुदृढ बालक अभियान

- ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांवर मोफत उपचार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा आरोग्य प्रशासनाच्यावतीने जिल्हयात जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानाअंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील २ लाख ७९ हजार ६४४ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी दरम्यान आजारी आढळुन आलेल्या बालकांना विशेषज्ञांकडे संदर्भीत करण्यात येऊन पुढील तपासण्या, औषधोपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय हत्तीरोग दुरीकरण मोहिमे १० ते २० फेब्रुवारी पर्यंत राबविण्यात येणार असुन, या मोहिमेदरम्यान पात्र लाभार्थ्यांनी वयानुसार व उंचीनुसार हत्तीरोगास प्रतिबंधात्मक गोळया समक्ष खाऊ घालण्यात येणार आहेत. तरी सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी या आरोग्य मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

आरोग्य विभागाच्या जिल्हा कृतीदलाच्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना या संदर्भात सुचना दिल्यात. जिल्हा कृतीदलाच्या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुंवर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिपचंद सोयाम, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.मनिषा साकोडे, जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ.अदिती त्याडी तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जागरुक पालक, सुदृढ बालक अभियान जिल्हयात ९ फेब्रुवारीपासुन राबविण्यात येणार असुन, हे अभियान पुढील दोन महिन्यापर्यंत राबविण्यात येणार आहे. जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या १४४ आरोग्य पथकांद्वारे बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे, रक्तक्षय, डोळयांचे आजार, गलगंड, दंत विकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग, अस्थमा, एपिलेप्सी इत्यांदी अन्य आजाराच्या संदिग्ध रुग्णांची ओळख पटवून त्यांचेवर त्वरीत औषधोपचार करण्यात येणार आहे.

जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानाअंतर्गत जिल्हयातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणीसाठी जिल्हयातील आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, वैद्यकिय शिक्षण व द्रव्ये विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, नगर विकास विभाग, पंचायत राज विभाग व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने सर्व शासकिय व निमशासकिय शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आश्रमशाळा, अंध-दिव्यांग शाळा, अंगणवाडया, बाल/बालसुधार गृहे, अनाथालये, समाजकल्याण व आदिवासी विभागाअंतर्गत मुलां-मुलींचे वस्तिगृहे, खाजगी नर्सरी, बालवाडया, खाजगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील बालकांची आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आलेल्या १४४ तपासणी पथकांकडून जिल्हयातील २२०१ शासकिय शाळा, ५३६ खाजगी/अनुदानीत शाळेतील एकुण २७ लाख ९६ हजार ४४ विदयार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानाअंतर्गत जिल्हयातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची शंभर टक्के आरोग्य तपासणी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos