महत्वाच्या बातम्या

 नवबजरंग गणेश मंडळात लोकसंवाद : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : शहरातील मानाचा महागणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवबजरंग गणेश मंडळाच्या १०५ व्या वर्षानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय, भंडारा यांच्या वतीने मंडळाच्या परिसरात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना, उपक्रम तसेच विकासकामांची माहिती नागरिकांना देण्यात आली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने लोकसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी क्रीडांगण व व्यायामशाळा विकास अनुदान योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली.

या योजनेंतर्गत ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांना क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी अनुदानाचा लाभ मिळू शकतो. तसेच शासनमान्य शाळा-महाविद्यालये, जिल्हा परिषद शाळा, आदिवासी विकास विभागाच्या शाळा व आश्रमशाळा, सामाजिक शाळा व संस्था, शासकीय प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांनाही नियमानुसार या योजनेचा लाभ मिळतो.

याशिवाय शासकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये, पोलीस विभाग व पोलीस कल्याण निधी तसेच शासनाकडून अनुदान सुरू होऊन किमान पाच वर्षे पूर्ण झालेली शासकीय कार्यालयेही नियमानुसार या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. उपलब्ध निधीतून क्रीडांगण विकास, व्यायामशाळा उभारणी तसेच आवश्यक क्रीडा सुविधांच्या विकासासाठी अनुदान दिले जाते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाला नगराध्यक्ष मधुरा मदनकर, तालुका क्रीडा अधिकारी भोजराज चौधरी, क्रीडा अधिकारी आकाश गायकवाड, नगरसेविका वृषाली ब्राह्मणकर, माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, नवबजरंग गणेश मंडळाचे अध्यक्ष जॅकी रावलानी, कार्याध्यक्ष अजय बाम्हणकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष मधुरा मदनकर यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन पात्र नागरिकांनी त्यांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.





  Print






Related Photos